Iranian woman in Moradabad Faiza Plea to PM Modi: इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे ६०० हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. इराणकडूनही इस्रायलवर क्षेपणास्त्र डागली जात आहेत. दरम्यान भारतात राहणाऱ्या इराणच्या मुलीचा व्हिडीओ समोर आला आहे. फैजा नावाच्या मुलीनं उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील दिवाकर कुमारशी लग्न केलं आणि दोघं मुरादाबादमध्ये एक इराणी कॅफे चालवितात. काही दिवसांपासून फैजाचा तिच्या कुटुंबियांशी संपर्क झालेला नाही. यावरून आता फैजानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीचं साकडं घातलं आहे.

फैजा आणि दिवाकर यूट्यूबवर एक चॅनेल चालवतात. या चॅनेलवर त्यांनी माध्यमांशी चर्चा करतानाचे काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तसेच पीटीआयशी बोलताना फैजानं तिच्या नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याचं म्हटलं आहे. तसेच पती दिवाकरच्या मोबाइलवरून ती सातत्याने इराणमधील मित्र आणि कुटुंबियांना फोन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण संपर्क होत नाही.

फैजानं पुढं म्हटलं की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक स्तरावरील एक प्रभावशाली नेते आहेत. मला विश्वास आहे की, त्यांनी मध्यस्थी केली तर युद्ध नक्कीच थांबेल. यामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी जाण्यापासून वाचू शकतील.

इस्रायलने हल्ले तीव्र केल्यानंतर इराणनं खबरदारी म्हणून इंटरनेट बंद केले आहे. फैजानं पती दिवाकरच्या मोबाइलमधून इराणमध्ये असेलल्या आई-वडिलांना, भाऊ-बहिणींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होत नाही आहे. कधी संपर्क झालाच तर समोरच्या व्यक्तीचा आवाज फोनवर येत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फैजानं पुढं सांगितलं की, इराण आणि इस्रायलमध्ये हल्ले वाढले आहेत. युद्धजन्य परिस्थिती गंभीर होत असल्यामुळं इराणमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इराणमधील आणि इराणचे लोक जगभरात जिथे जिथे गेले, ते सर्व लोक सध्या मानसिक तणावाखाली आहेत. सध्या इराणने हवाई क्षेत्र बंद ठेवल्यामुळं तिथून सामान्य व्यक्तीला बाहेर जाता येत नाहीये किंवा कुणाला बाहेरून इराणमध्ये जाता येणार नाही. पण जर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दाबव वाढला तर हे युद्ध तात्काळ थांबू शकते.