संघटनेतून पळालेल्या जर्मन दहशतवाद्याची कबुली
संपूर्ण युरोपभर नियोजनपूर्वक हल्ले करण्याचा आयसिसचा डाव असल्याची माहिती या संघटनेतून पळालेल्या हॅरी एस. या माजी जर्मन दहशतवाद्याने दिली आहे. जर्मनीच्या सुरक्षा यंत्रणेकडून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान त्याने ही माहिती दिल्याचे ‘डेली एक्स्प्रेस’च्या वृत्तात म्हटले आहे.
सीरियामध्ये तीन महिने आयसिसच्या क्रौर्याचा साक्षीदार असलेला हॅरी पळून आला. आयसिसला युरोपमध्ये एकाच वेळी नियोजनपूर्वक हल्ले करायचे आहेत. हाती चाकू घ्यावा आणि समोर येणाऱ्या प्रत्येक नास्तिक व्यक्तीला भोकसावे, असे आयसिसच्या दहशतवाद्यांना वाटत होते, असे त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले. सीरियात दहशतवादी कारवायांतील सहभागाबरोबरच रक्का शहरात दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षणास उपस्थित राहिल्याची कबुली त्याने दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
मे २०१५ मध्ये प्रसारित झालेल्या एका चित्रफितीत हॅरी आससिसच्या ध्वजासोबत दिसत होता. ओलीस ठेवलेल्या दोघांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आल्याचेही या चित्रफितीत दिसत होते. आयसिसचा सदस्य असल्याचा आरोप हॅरीवर असून त्याला अनेक वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.