‘सीआयए’च्या माजी प्रमुखांचा नव्या पुस्तकात गौप्यस्फोट

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या आयएसआय या शक्तिशाली गुप्तचर यंत्रणेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले होते, अशी कबुली या हल्ल्यानंतर आयएसआयचे तत्कालीन प्रमुख अहमद शुजा पाशा यांनी दिली, मात्र त्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास नकार दिला, असा गौप्यस्फोट सीआयएच्या माजी प्रमुखांनी नव्या पुस्तकात केला आहे.

अल-कायदा, तालिबान, लष्कर-ए-तोयबा आणि हक्कानी या दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करण्याची वेळ आली तेव्हा पाकिस्तानातील नेत्यांच्या लबाडीमुळे नैराश्येची भावना आल्याचे मायकेल हेडन या सीआयएच्या माजी संचालकांनी आपल्या ‘प्लेइंग टू दी एज’ या पुस्तकात म्हटले आहे.

पाकिस्तानचे लष्कर भारताविरुद्ध लढण्यासाठी आहे, दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी नव्हे, असे स्पष्ट करून पाकिस्तानातील नेत्यांनी, अमेरिकेने इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करण्यास असमर्थता दर्शविली होती, असे मायकेल हेडन यांनी पुस्तकात म्हटले आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ला हे लष्कर-ए-तोयबाचे कृत्य होते, याबद्दल आम्हाला संशय नव्हता, हल्ल्याची तयारी पाकिस्तानातच करण्यात आली होती आणि त्याचे मार्गदर्शनही तेथूनच करण्यात आले याचे ठोस पुरावे आहेत, लष्कर-ए-तोयबाला पाकिस्तानातच संरक्षण आणि आयएसआयचा पाठिंबा मिळत आहे, असे हेडन यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या लष्करी कारवाईचे माजी महासंचालक अहमद शुजा पाशा यांच्याशी आपण दूरध्वनीवरून सातत्याने संपर्क साधत होतो आणि त्यांना या हल्ल्याच्या मुळाशी जाण्याच्या सूचना करीत होतो, असे हेडन यांनी म्हटले आहे.

पाशा यांनी आयएसआयची अलीकडेच सूत्रे स्वीकारली होती आणि गुप्तचर यंत्रणेत काम करण्याचा त्यांना अनुभव नव्हता. ते अमेरिकेला नाताळच्या दिवशी आले आणि आपल्या कार्यालयातच त्यांनी वेळ घालविला, असे हेडन म्हणाले.