Israel Attacks Hamas Leadership In On Doha: कतारची राजधानी दोहामध्ये आज एक मोठा हवाई हल्ला झाला आहे. मंगळवारी इस्रायली सैन्याने हमासच्या नेतृत्वाला लक्ष्य करून हवाई हल्ला केल्याचे सांगितले. कतारची राजधानी दोहामध्ये स्फोटाचा आवाज ऐकू येताच इस्रायली सैन्याने ही घोषणा केली. अल जझीरा या संकेतस्थळाने दोहामध्ये मोठा स्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण यामागे काय कारण होते हे, स्पष्ट केले नाही.

एका इस्रायली अधिकाऱ्याने असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांनी कतारची राजधानी दोहामध्ये हमासच्या नेतृत्वाला लक्ष्य केले आहे. सार्वजनिक निवेदनाव्यतिरिक्त भाष्य करण्याचा अधिकार नसल्यामुळे अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. कतारने त्यांच्या राजधानी दोहा येथील हमासच्या राजकीय मुख्यालयावर झालेल्या इस्रायली हल्ल्याचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल-अन्सारी यांनी याला “सर्व आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे उघड उल्लंघन”, असे म्हटले आहे.

हमासचे नेतृत्व करणारे नेते कतारमध्ये दीर्घकाळापासून राहत आहेत. गाझा पट्टीतील अलीकडील युद्धादरम्यान आणि त्यापूर्वीही, हमास आणि इस्रायलमधील वाटाघाटींमध्ये याच नेतृत्वाने अनेक वर्षांपासून मध्यस्थीची भूमिका बजावली आहे. दोहामध्ये हमासच्या उच्च नेतृत्वावर झालेल्या हल्ल्यामुळे गाझामध्ये युद्धबंदी आणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हमासच्या हल्ल्यात ताब्यात घेतलेल्या ओलिसांच्या सुटकेवरील चर्चा आणखी गुंतागुंतीची होऊ शकते.

इस्रायली लष्कराने दावा केला की, त्यांनी हल्ल्यात नागरिकांचे नुकसान कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत, ज्यामध्ये अचूक शस्त्रे आणि इतर गुप्तचर यंत्रणांचा वापर यांचा समावेश आहे. इस्रायली मीडिया हाऊस चॅनल १२ नुसार, कतारमधील हमास नेतृत्वावर केलेल्या हल्ल्याचे अधिकृत नाव “अत्झेरेट हदीन” आहे.