वृत्तसंस्था, जेरुसलेम

इस्रायलने मंगळवारी पहाटे दक्षिण गाझामधील दोन गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात बॉम्बवर्षांव केला अशी माहिती पॅलेस्टिनी नागरिकांनी दिली. इस्रायलने शुक्रवारी उत्तर गाझामधील लोकांना दक्षिण गाझाकडे जाण्याचे आदेश दिले होते, त्याच भागावर इस्रायलने हल्ला केला.

गाझामधून सुटका करून घेण्यासाठी हजारो लोक इजिप्तला लागून असलेल्या राफा सीमेवर जमले आहेत. मात्र, ही सीमा अद्याप खुली झालेली नाही. दुसरीकडे, इजिप्तच्या बाजूला मोठय़ा प्रमाणात मदतसामग्री घेऊन आलेले ट्रक उभे आहेत. ही मदतसामग्री सामान्य पॅलेस्टिनी लोकांपर्यंत पोहोचवता यावी यासाठी मध्यस्थी केली जात आहे. पण अद्याप ते यशस्वी झालेले नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन बुधवारी जॉर्डन आणि इस्रायलच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या भेटीत या प्रयत्नांना बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.