Israel – Hamas War : गेल्या १६ दिवसांपासून इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत घमासान युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर क्षेपणास्रं डागली जात आहेत. तसेच दोन्ही बाजूने सुरू असलेले हवाई हल्ले आणि सीमेवरील अंधाधुंद गोळीबारात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. हे युद्ध कधी थांबेल याची कोणतीही शाश्वती दिली जात नाही. दरम्यान इस्रायलने युद्धविरामाचा एक पर्याय सुचवला आहे. इस्रायली लष्कराने दिलेला पर्याय हमासने मान्य केला तर हे युद्ध थांबू शकतं. हमासने पूर्णपणे आत्मसमर्पण करून ओलिसांना मुक्त केल्यास युद्धविराम केला जाईल, असं इस्रायलच्या लष्कराने म्हटलं आहे. परंतु, हमास इस्रायली लष्कराची ही अट मान्य करेल अशी चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत.

दरम्यान, इस्रायलच्या लष्कराने (आयडीएफ) एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, गाझा पट्टीतले नागरिक संकटात आहेत. हमास गाझातल्या मशिदींवर क्षेपणास्रं डागत आहे. हमासचे दहशतवादी गाझा पट्टीतल्या नागरिकांचं इंधन आणि पाणी चोरून नेत आहेत. गाझात हमासचं भ्रष्ट सरकार आहे. परंतु, यांनी कधीच गाझातल्या नागरिकांसाठी वीज किंवा पाण्याची व्यवस्था केली नाही. इस्रायल गाझातल्या नागरिकांना वीज आणि पाणी पुरवतंय, तर त्याच वीजेची जोडणी आणि पाण्याचा पुरवठा तोडून हमासचे दहशतवादी परत इस्रायलवरच आरोप करत आहेत.

आयडीएफने म्हटलं आहे की, हमासने निष्पाप लोकांचे बळी घेतले नसते, स्रियांवर अत्याचार केले नसते, त्यांनी निष्पाप नागरिकांचं अपहरण केलं नसतं, तर इस्रायल या युद्धात नसतं. हमासने इस्रायलवर आक्रमण केलं नसतं तर आम्ही या युद्धात नसतो. आमची आणि गाझातल्या नागरिकांची समस्या एकच आहे. हमास ही आमच्यासमोरची एकमेव समस्या आहे.

हे ही वाचा >> Israel Airstrike : इस्रायलकडून रात्रभर हवाई हल्ले, ३० पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू, क्रूर हल्ले थांबवण्यासाठी इराणशी चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ इस्रायलनं ‘एक्स’ या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यामध्ये इस्रायली नागरिकांवर कशा प्रकारे हमासच्या दहशतवाद्यांनी अत्याचार केला. हमासने नागरिकांवर बेछूट गोळीबार केल्याचा आणि रस्त्यावरील वाहने पेटवून दिल्याचा व्हिडीओ पाहायला मिळत आहे.