Israel – Hamas War : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासमधील युद्धाचा आजचा १२ वा दिवस आहे. या युद्धात अनेक देशांनी इस्रायल किंवा पॅलेस्टाईनपैकी एका देशाला पाठिंबा दर्शवला आहे. अशातच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आज इस्रायलचा दौरा केला. बायडेन यांनी इस्रायलमधलं मोठं व्यापारी शहर तेल अवीव येथे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली. इस्रायल आणि गाझामधल्या संपूर्ण परिस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा केली. दरम्यान, बायडेन यांनी नेतन्याहू यांना रागाच्या भरात कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका असा सल्ला दिला आहे.
जो बायडेन बेंजामिन नेतन्याहू यांना म्हणाले, अमेरिकेवरील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही ज्या चुका केल्या, तुम्ही त्या चुकांची पुनरावृत्ती करू नका. बायडेन म्हणाले, मी इथे येऊन जगाला दाखवून देणार होतो की आम्ही इस्रायलबरोबर खंबीरपणे उभे आहोत. हमासने निर्दयीपणे इस्रायली जनतेची कत्तल केली आहे. ते इसिसपेक्षा वाईट आहेत. इस्रायलला त्यांचं स्वसंरक्षण करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. यात अमेरिका नक्कीच इस्रायलची मदत करेल.
जो बायडेन म्हणाले, मला इथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, बहुसंख्य पॅलेस्टिनी नागरिक म्हणजे हमास नव्हे. त्याचबरोबर हमास पॅलेस्टाईनचं प्रतिनिधीत्व करत नाही. दरम्यान, अमेरिकेने पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासवर अनेक अनेक निर्बंध लादले आहेत. हमासची आर्थिक नाकेबंदी करणं हे यामागचं प्रमुख उद्दिष्ट आहे. हमासचे सदस्य आणि त्यांना पैसे पुरवणारे फायनान्सर या निर्बंधांच्या कक्षेत येतील, असा विश्वास बायडेन यांनी व्यक्त केला आहे. हमासने बेकायदेशीरपणे लाखो डॉलर्स मिळवल्याचा दावा बायडेन प्रशासनाने केला आहे. त्यामुळेच अमेरिकेने निर्बंधांचं शस्त्र उपसलं आहे.
हे ही वाचा >> इस्रायल-हमास युद्धाबाबत शरद पवारांच्या भूमिकेवर केंद्रीय मंत्र्याचा संताप; म्हणाले, “ही कुजकी मानसिकता…”
गाझामधील रुग्णालयावरील हल्ल्याबाबत बायडेन यांचं मोठं वक्तव्य
दरम्यान, यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, अमेरिकेचं इस्रायली जनतेबरोबर उभं राहणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. या परिस्थितीत तुम्ही आमच्या देशात आलात हे खूप मार्मिक आहे. मी इस्रायली जनतेच्या वतीने आपले आणि अमेरिकेचे आभार मानतो. काल, आज आणि नेहमीच तुम्ही आमच्याबरोबर उभे राहिलात यासाठी तुमचे आभार. तसेच यावेळी बायडेन म्हणाले, गाझातल्या रुग्णालयावर झालेला हल्ला हा इस्रायली सैन्याने नव्हे तर दुसऱ्या बाजूने (हमासने) झाला आहे.