वृत्तसंस्था, दुबई

इस्रायल आणि इराण यांच्यादरम्यान शुक्रवारी सुरू झालेला संघर्ष रविवारी, तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाला. दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. दरम्यान, रविवारी अमेरिका व इराणदरम्यान ओमान येथे होणार असलेली अणुकरार चर्चा रद्द करण्यात आली. इस्रायलने मृतांचा आकडा १४ जाहीर केला असून, इराणने एकूण आकडेवारी जाहीर केलेली नाही. मात्र, शुक्रवारी ७८ जण ठार झाल्याचे इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील राजदूतांनी सांगितले होते. तर शनिवारी ६० जण ठार झाल्याचे वृत्त तेथील माध्यमांनी दिले.

इराणने इस्रायलच्या तेल अविव, बात याम या शहरांमधील काही इमारतींना लक्ष्य केले. तर, इस्रायलने रविवारी दुपारी इराणची राजधानी तेहरानवर जोरदार हल्ले केले. तसेच शनिवारी रात्रीपासून दोन तेल व नैसर्गिक वायू शुद्धिकरण प्रकल्पांवर हल्ले केले. इस्रायलच्या लष्कराने समाजमाध्यमांवरून इराणी जनतेला शस्त्रास्त्रांचे कारखाने रिकामे करण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून हे हल्ले आणखी काही दिवस सुरूच राहतील अशी शक्यता आहे.

दरम्यान, आपण भारत आणि पाकिस्तानदरम्यान जसा शस्त्रविराम घडवला तसाच तो इराण आणि इस्रायलदरम्यानही घडवू असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या समाजमाध्यमावर लिहिले आहे. यासाठी चर्चा आधीच सुरू झाली असल्याचे त्यांनी सूचित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इराणमध्ये ४०६ ठार?

इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान ४०६ जण ठार झाले असून इतर ६५४ जखमी झाले आहेत अशी माहिती वॉशिंग्टनस्थित ‘ह्युमन राइट्स अॅक्टिव्हिस्ट्स’ या मानवाधिकार संघटनेने रविवारी दिली. मात्र, इराणच्या सरकारने अद्याप एकूण आकडेवारी जाहीर केलेली नाही.