Israel Iran Conflict mossad releases videos of israeli attacks in Iran : मध्य-पूर्व आशियात सध्या मोठ्या प्रणाणात तणाव निर्माण झाला आहे. इस्रायली लष्कराने शुक्रवारी पहाटे ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करून इराणवर हवाई हल्ला केला. पाठोपाठ इराणनेही रात्री इस्रायलवर १५० क्षेपणास्रे डागून जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. यादरम्यान इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने नुकतेच त्यांनी इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांनी पार्श्वभूमी कशी तयार केली गेली याबद्दल मोठा खुलासा केला आहे. इस्त्रायलने शुक्रवारी रात्री इराणवर आजवरचा सर्वा मोठा हल्ला केला. आता या हल्ल्यांबद्दल अधिक माहिती देणारे व्हिडीओ समोर आले आहेत

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणमध्ये राबवण्यात आलेल्या या लष्करी मोहिमेचे सांकेतिक नाव हे ‘ऑपरेशन रायझिंग लायन’असे होते. मोसादकडून जारी करण्यात आलेल्या या ऑपरेशनच्या व्हिडीओमध्ये इस्त्रायलकडून इराणचा अणू कार्यक्रम आणि लष्करी इमारतींना लक्ष्य करत हल्ले केल्याचे दिसून येत आहे. तसेच इराणमधील मिसाइल लॉन्चर्सना देखील लक्ष्य केल्याचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

इस्त्रायली अधिककाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणमध्ये केलेले हल्ल्यासाठी इस्त्रायलने शस्त्रास्त्रांची तस्करी करून ते इराणमध्ये आणले होते आणि त्यानंतर एक ड्रोन बेस तयार केला, यानंतर ड्रोन्सनी लक्ष्य करून इराणाची हवाई सुरक्षा प्रणाली निकामी करण्यात आली.

रात्रीच्या वेळी मोसादचे कमांडो मध्य इराणमध्ये घुसले आणि त्यांनी तस्करी करून आणलेल्या शस्त्रांच्या मदतीने रडार सिस्टम आणि एस-३०० एअर डिफेन्स सिस्टम निकामी करण्यासाठी माहिती गोळा केली. त्यांनी एकप्रकारे इराणीयन एअरोस्पेसमध्ये इस्त्रायली लढाऊ विमानांना घुसखोरी करण्यासाठीचा रस्ता मोकळा केला, असे वृ्त्त टाइम्स ऑफ इस्त्रायलने दिले आहे.

दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कथित व्हिडीओमध्ये मोसादने ड्रोनच्या मदतीने तेहरान जवळच्या इमारतींना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोसादच्या गुप्त कारवाईमुळे इस्रायली हवाई दलाला शुक्रवारी पहाटे २०० हून अधिक विमाने उडवून इराणमध्ये हल्ले करता येणे शक्य झाले.

तेहरानजवळील तळावर तैनात असलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लाँचर्स नष्ट करण्यासाठीही इस्त्रायलकडून ड्रोनचा वापर करण्यात आला.

इ्सत्रायलच्या हल्ल्यात इराणच्या लष्करी आणि न्यूक्लिअर अस्थापनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच इस्त्रायलच्या हल्ल्यात अनेक वरिष्ठ इराणीयन लष्करी अधिकारी ठार झाले आहेत. यामध्ये सशस्त्र दलांचे प्रमुख जनरल मोहम्मद बाघेरी, रिव्हॉल्युशनरी गार्डचे प्रमुख जनरल हुसेन सलामी, बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रामचे प्रमुख आमिर अली हाजीजादेह यांच्यासह दोन अणुशास्त्रज्ञ देखील ठार झाले आहेत.