गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून इस्रायल व हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धाला अद्याप पूर्णविराम लागलेला नसून इस्रायलनं सातत्याने गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर हल्ले चालूच ठेवले आहेत. गेल्या अडीच महिन्यांत या युद्धात इस्रायलचे १२०० नागरिक व सैनिक मारले गेले. प्रत्युत्तरात इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत २१ हजारहून जास्त पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे युद्धाबाबत जागतिक पातळीवर चिंतेचं वातावरण असताना आता बेंजामिन नेतान्याहू यांनी केलेल्या सूचक विधानामुळे ही चिंता अधिकच वाढली आहे.

आता नेतान्याहूंची नजर फिलाडेल्फिया कॉरिडॉरवर!

शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझा पट्टीतील हमासवरच्या हल्ल्यांबाबत भूमिका मांडली. “आता युद्ध सर्वोच्च बिंदूवर पोहोचलं आहे” असं नेतान्याहू म्हणाले. त्याशिवाय इजिप्त आणि गाझापट्टीदरम्यानचा फिलाडेल्फिया कॉरिडॉर इस्रायलयच्या ताब्यात असायला हवा, अशी भूमिका नेतान्याहू यांनी यावेळी मांडली. त्यामुळे जवळपास संपूर्ण गाझापट्टीत हल्ले केल्यानंतर आता दोन्ही देशांच्या सीमाभागातील हा पूर्ण पट्टा आपल्या ताब्यात घेण्याच्या दिशेनं इस्रायलच्या सैन्यानं आगेकूच केल्याचं दिसून येत आहे.

“हा कॉरिडॉर पूर्णपणे बंदच व्हायला हवा. त्याशिवाय आपल्याला या भागात अपेक्षित असलेलं निर्लष्करीकरण साध्य होणं अशक्य आहे”, असंही नेतान्याहू यावेळी म्हणाले.

गाझामध्ये मृत्यूचे तांडव, २४ तासांत १६५ पॅलेस्टिनी ठार; इस्रायलला शस्त्रविक्रीस बायडेन यांची मंजुरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००५ साली झालेल्या करानानुसार इस्रायलयनं गाझा पट्टीतून आपलं सैन्य माघारी घेतलं होतं. तेव्हापासून या भागात हमासचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र, आता इस्रायलनं पूर्ण गाझा पट्टीतून हमासला हद्दपार करण्याची भाषा सुरू केल्यामुळे हे थेट २००५ च्या कराराचं उल्लंघन ठरेल, असं बोललं जात आहे. याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमके कसे पडसाद उमटणार, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.