देर अल-बलाह : ‘हमास’ने अटी मान्य न केल्यास गाझा शहर उद्ध्वस्त होईल, असा इशारा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी दिला. इस्रायलने गाझातील ७५ टक्के भागावर कब्जा केला असून, या भागात हल्ल्याची तयारीही केली जात आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी गाझा शहर ताब्यात घेण्यासाठी लष्कराला मोठी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर दुसऱ्याच दिवशी संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी इशारा दिला की, गाझा हे सर्वांत मोठे शहर रफाह आणि बेत हानूनमध्ये बदलू शकते, जे युद्धाच्या सुरुवातीला उद्ध्वस्त झाले आहे.
युद्ध संपवण्यासाठी इस्रायलच्या अटी मान्य न करणाऱ्या गाझामधील हमासच्या सदस्यांसाठी नरकाचे दरवाजे लवकरच उघडतील, असे काट्झ यांनी समाजमाध्यमात म्हटले आहे. सर्व ओलिसांची सुटका आणि हमासचे संपूर्ण नि:शस्त्रीकरण, या युद्धबंदीच्या मागण्यांची इस्रायलने हमासला पुन्हा आठवण करून दिली. परंतु हमासने युद्ध संपवण्याच्या बदल्यात बंदिवानांची सुटका करणार असल्याचे म्हटले आहे, तसेच पॅलेस्टिनी राज्य निर्माण केल्याशिवाय नि:शस्त्रीकरण करणार नाही, असा निर्धारही केला आहे. दरम्यान, इस्रायलच्या आक्रमक पवित्र्याने गाझा शहरात येत्या काही दिवसांत व्यापक कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे.