वृत्तसंस्था, तेल अवीव

इराणने रविवारी केलेला अनपेक्षित हल्ला रोखण्यात यशस्वी झाल्याचे सांगत इस्रायलने आपल्या हवाई दलाचे कौतुक केले. इराणनी सोडलेली ३०० हून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे इस्रायल आणि मित्र राष्ट्रांनी नष्ट केल्याचे इस्रायलने सांगितले. या हल्ल्याला इस्रायलकडून प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता असल्याने प्रादेशिक तणाव कायम आहे.इराणने रविवारी पहाटे १७० ड्रोन, ३० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि १२० हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे सोडली होती असे इस्रायलने सांगितले.

सीरियातील इराणी वाणिज्य दूतावासावर १ एप्रिल रोजी झालेल्या हवाई हल्ल्यात दोन इराणी जनरल मारले गेले. या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप इराणने केला होता. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्त्रायलवर हल्ला केल्याचे सांगितले जाते. इराणने रविवारी सकाळी हल्ला संपल्याचे जाहीर केले. तर इस्रायलनेही आपली हवाई हद्द खुली केली आहे.

हेही वाचा >>>कॅनडामध्ये भारतीय तरुणाची हत्या? कारमध्ये आढळला मृतदेह, पोलीस म्हणाले…

दोन्ही देश अनेक वर्षांपासून एकमेकांशी युद्ध करत आहेत. यात दमास्कस हल्ल्यासारख्या अनेक घटनांचा समावेश आहे. परंतु १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर सुरू झालेल्या अनेक दशकांच्या शत्रुत्वानंतर इराणने इस्रायलवर थेट हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने गेल्या काही वर्षांमध्ये एक बहुस्तरीय हवाई संरक्षण यंत्रणा तयार केली आहे. यात लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि कमी पल्ल्याच्या रॉकेटसह विविध प्रकारचे हल्ले रोखण्यास सक्षम असलेल्या प्रणालींचा समावेश आहे. ही यंत्रणा आणि अमेरिकन व इतर सैन्याच्या मदतीने इराणच्या या हल्ल्यापासून इस्रायलला स्वत:चे संरक्षण करता आले.

इराणच्या हल्ल्याला इस्रायल प्रत्युत्तर देईल का या प्रश्नावर इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रियर एडम डॅनियल हगरी यांनी सांगितले की देश आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ते करेल. इस्रायलपर्यंत कोणतेही ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे पोहोचली नाहीत, फक्त काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पोहोचली. ज्यात दक्षिण इस्रायलमधील गावात एक मुलगी जखमी झाली आहे.

हेही वाचा >>>“हा फक्त ट्रेलर…”, बिश्नोई गँगने स्वीकारली गोळीबाराची जबाबदारी; फेसबुक पोस्टमध्ये लिहिले…

‘आम्ही रोखले. निष्प्रभ केले. आम्ही जिंकू.’ अशी पोस्ट इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी समाजमाध्यमांवर केली आहे. तर संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी अमेरिका आणि इतर देशांचे मदतीबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, इस्रायलने सतर्क राहणे आणि कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जी-७ राष्ट्रांची बैठक

इराणच्या या भ्याड हल्ल्याला एकत्रित राजनयिक प्रत्युत्तर देण्यासाठी जी-७ राष्ट्रांची बैठक बोलवण्यात येईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले. इराणचा हल्ला लष्करी संघर्षांत बदलू इच्छित नाही, असे बायडेन यांच्या वक्तव्याने सूचित केले. बायडेन यांनी नेतान्याहू यांच्याशी संवाद साधला. परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी रविवारी एका निवेदनात सांगितले की अमेरिका ‘‘तणाव वाढवू इच्छित नाही’’ आणि येत्या काही दिवसांत ते आपल्या मित्र राष्ट्रांशी चर्चा करतील. अमेरिकेने, त्याच्या मित्र राष्ट्रांसह, तेहरानला स्पष्ट संदेश पाठवून संघर्ष आणखी न वाढविण्याचा इशारा दिला आहे.