हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला चढवल्यानंतर इस्रायलने अतिशय आक्रमकपणे गाझा पट्टीत हल्ले चढवले. यात अनेक निरपराध लोकांचेही जीव गेले. मात्र, इस्रायल वारंवार हमासचा बिमोड केल्याशिवाय युद्ध थांबणार नाही, असं सांगत आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत गिलाद एर्डन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठी विधानं केली. यात त्यांनी हमासचा खात्मा केल्यानंतर गाझात कोण सरकार चालवणार यावर भाष्य केलं आहे.

इस्रायल संयुक्त राष्ट्राच्या नेतृत्वातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय शक्तीने गाझाचं नियंत्रण करण्याला विरोध करेल, अशी जाहीर भूमिका एर्डन यांनी घेतली. तसेच सध्याच्या गाझातील परिस्थितीला संयुक्त राष्ट्रच जबाबदार असल्याचा आरोप केला.

“हमासचा खात्मा केल्यानंतर आम्ही गाझाच्या भविष्याबद्दल…”

“आम्ही अरब देशांसाठी ही हमासची घाण साफ करण्याचं काम करत आहोत. इस्रायलने हमास या दहशतवादी संघटनेचा खात्मा करण्यात आल्यानंतर आम्ही गाझाच्या भविष्याबद्दल अरब देशांशी चर्चा करू,” असंही नमूद केलं.

“हमासच्या खात्म्यानंतर गाझाचं अंतरिम सरकार चालवण्याबाबत…”

“हमासच्या खात्म्यानंतर गाझाचं अंतरिम सरकार चालवण्याबाबत अरब देशांसाठी लवकरच चर्च सुरू होईल. त्यात इस्रायलचाही सहभाग असेल. मला खात्री आहे की, हमास जशी आमची शत्रू आहे, तशीच ती अनेक अरब देशांचीही शत्रू आहे. हमास अनेक मुस्लीम देशांची शत्रू आहे,” असं मत एर्डन यांनी व्यक्त केलं.

इस्रायलचे संयुक्त राष्ट्रावर गंभीर आरोप

इस्रायलचे राजदूत एर्डन यांनी संयुक्त राष्ट्रावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “संयुक्त राष्ट्रामुळेच गाझातील आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रानेच हमासला इस्रायल आणि जगाविरोधात गाझाचा उपयोग युद्ध मशीन म्हणून करण्यास मोकळीक दिली. इस्रायलने हमासविरोधातील युद्ध जिंकल्यावर संयुक्त राष्ट्राबरोबरच्या संबंधांवर इस्रायलने गंभीरपणे विचार केला पाहिजे.”

हेही वाचा : रुग्णांना वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्येच राहिलेल्या डॉक्टरचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“संयुक्त राष्ट्राच्या त्या अधिकाऱ्यांचा विसा नाकारला पाहिजे”

“माझ्यामते संयुक्त राष्ट्रातील जे लोक आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहेत त्या काही अधिकाऱ्यांचा विसा नाकारला पाहिजे. ते हमासने सांगितलेलं खोटं पसरवत आहेत. त्यांच्यामुळे मागील १६ वर्षांपासून हमास संयुक्ता राष्ट्राच्या उपस्थितीत अनेक भयंकर गोष्टी करत आहेत,” असा गंभीर आरोप एर्डन यांनी केला.