Israel vs Iran Army comparison : इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर रात्री इराणनेही इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्र डागून चोख प्रत्युत्तर दिलं. इराणने इस्रायलमधील जेरुसलेम व तेल अवीवसह अनेक प्रमुख शहरांना लक्ष्य केलं. दरम्यान, इस्रायलने इराणविरोधात ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ ही मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत इराणवर हल्ले चालू आहेत. इराणकडूनही क्षेपणास्त्र हल्ले, बॉम्पवर्षाव चालू आहे.

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या लष्करातील पाच मोठे अधिकारी व सहा अणूशास्त्रज्ञ मृत्यूमुखी पडले आहेत. यासह इराणमधील ७८ जणांचा बळी गेल्याची माहिती इराणने संयुक्त राष्ट्राला दिली आहे. तसेच इस्रायलमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी आहेत. या दोन देशांमधील युद्धामुळे मध्य-पूर्व आशियात खूप तणाव निर्माण झाला आहे. या युद्धाचे जगभर गंभीर परिणाम होत आहेत. तेलाच्या किंमती वाढल्या असून अमेरिका व भारतासह अनेक देशांचे भांडवली बाजार गडगडू लागले आहेत.

कोणाचं सैन्य अधिक शक्तिशाली?

दरम्यान, या युद्धात कोणत्या देशाचं सैन्य अधिक शक्तीशाली आहे, कोण वरचढ आहे? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. याबाबत एपी न्यूजने म्हटलं आहे की इराणकडे मोठं सैन्य आहे परंतु ते गुप्त कारवायांवर अवलंबून आहे. मात्र, इस्रायली सैनिकांची संख्या तुलनेने कमी असली तरी अमेरिकेच्या पाठिंब्यावर, मोसाद या शक्तीशाली गुप्तचर यंत्रणेच्या मदतीवर त्यांचं सैन्य अनेक मोठ्या कारवायांमध्ये आजवर यशस्वी होत आलं आहे.

इराणची ताकद किती?

इराणची लोकसंख्या ८.८ कोटी इतकी असून १६ लाख चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ या देशाला लाभलं आहे. तर इस्रायलची लोकसंख्या केवळ ९० लाख असून या देशाकडे २२,००० चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे.

इराणचं सैन्य वेगवेगळ्या दलांमध्ये विभागलं गेलं आहे. यामध्ये सीमांचं रक्षण करण्यासाठी, पारंपरिक लष्करी कारवांयासाठी, निलष्करी, क्रांतिकारी, एलिट फोर्स, स्ट्रॅटेजिक मिसाइल कमांड फोर्स, सायबर फोर्सचा समावेश आहे. इराणच्या सैन्यात ६ लाख जवान, क्रांतिकारी दलात २ लाख जवान आहेत.

इस्रायलयच्या वायूदलापुढे इराणची ताकद कमी

इराणकडे रशियाने पुरवलेली अत्याधुनिक लढाऊ विमाने आहेत. मात्र, त्यांची संख्या खूप कमी आहे. इराणी वायूदलाच्या ताफ्यात ३५० जुनी विमाने आहेत. जी तंत्रज्ञान व दर्जाच्या बाबतीत इस्रायलपेक्षा खूपच मागे आहेत. मात्र, इराणकडे ड्रोन्सचा मोठा ताफा आहे.

इराणमध्ये त्यांच्या कमांडर्सची सुरक्षा ही नेहमी उद्भवणारी समस्या आहे. मागील २४ तासांत इस्रायली हल्ल्यात इराणचे पाच मोठे लष्करी अधिकारी मृत्यूमुखी पडले असून दोन अधिकारी गंभीररित्या जखमी झाले आहेत.

इस्रायलकडे अण्वस्त्रे

गेल्या काही वर्षांत इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम खुपे पुढे सरकला आहे. त्यांनी अण्वस्त्रे तयार करण्यासाठी पुरेसं युरेनियम तयार केल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र, इराणने त्याची पुष्टी केलेली नाही. अण्वस्त्र कार्यक्रमावर इराण मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. तर, मध्य-पूर्व आशियात इस्रायल हा एकमेव अण्वस्त्रधारी देश आहे. मात्र, आपल्याकडे अण्वस्त्रे असल्याचं इस्रायलने कधीही मान्य केलेलं नाही.

क्षेपणास्त्र ही इराणची मोठी ताकद आहे. काही महिन्यांपूर्वी इस्रायलबरोबर संघर्ष झाला तेव्हा इराणने इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्रे डागली होती. काल रात्री देखील इराणने इस्रायलवर १५० हून क्षेपणास्त्र डागली आहेत.

इस्रायलची स्थिती काय?

इस्रायलचं भूदल, नौदल व हवाईदल खूप शक्तीशाली आहे. नवं तंत्रज्ञान, अमेरिका व युरोपकडून मिळालेल्या शस्त्रांस्रांसह इस्रायली लष्कराचं बळ आणखी वाढलं आहे. इस्रायल एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढाया करू शकतो. यापूर्वी देखील इस्रायलने एकाच वेळी अनेक देशांशी युद्ध जिंकली आहेत. इस्रायलच्या सैन्यात १.७० लाख सक्रीय जवान असून ४ लाख राखीव सैनिक आहेत.

इराणने डागलेली क्षेपणास्त्रे इस्रायलने हवेतच उद्ध्वस्त केल्याचं आतापर्यंत अनेकदा पाहायला मिळालं आहे. क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट करण्यासाठी इस्रायलने आयर्न डोम यंत्रणा तयार केली आहे. इस्रायलच्या शेजारी असलेल्या गाझा पट्टी आणि पॅलेस्टाईनकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर २०११ साली आयर्न डोमची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. इस्रायलचे लष्करी अधिकारी म्हणतात की ही प्रणाली १०० टक्के हमी देत नाही. मात्र, यामुळे गंभीर नुकसान टळते, मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळता येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संरक्षण खर्चाच्या बाबत इस्रायल इराणच्या खूप पुढे आहे. इस्रायलचं संरक्षण बजेट २४ अब्ज डॉलर्स इतकं आहे; तर इराणचं ९.९५ अब्ज डॉलर्स इतकं बजेट आहे.