Israel Can Learn From PM Modi: इस्रायली राजकीय विश्लेषक झाकी शालोम यांनी म्हटले आहे की, इस्रायलने भारताकडून राष्ट्रीय सन्मानाला धोरणात्मक संपत्ती कशी बनवायचे हे शिकले पाहिजे. द जेरुसलेम पोस्टमधील एका लेखात, मिसगॅव्ह इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी अँड झायनिस्ट स्ट्रॅटेजी येथील वरिष्ठ फेलो शालोम यांनी म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेविरुद्ध टॅरिफ धोरणावर कठोर भूमिका घेतली आहे आणि भारताच्या पाकिस्तानसोबतच्या सीमा संघर्षांबद्दल त्यांचा दृष्टिकोन दर्शवितो की, राष्ट्रीय सन्मान ही चैनीची वस्तू नाही तर दूरगामी धोरणात्मक संपत्ती आहे.”

मोदींचा कठोर प्रतिसाद

अलिकडच्या काही महिन्यांत, रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीमुळे अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादले आहेत. यामुळे भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार तणाव निर्माण झाला आहे. भारताचा पाकिस्तानशी झालेला सीमा संघर्ष थांबवल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला आहे.

“पंतप्रधान मोदींचा कठोर प्रतिसाद केवळ आर्थिक आणि लष्करी तणावातच नव्हता, तर तो प्रामुख्याने वैयक्तिक आणि राष्ट्रीय सन्मानाच्या अपमानाच्या भावनेतून निर्माण झाला होता. त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे चार फोन कॉल नाकारले. यातून इस्रायल काहीतरी महत्त्वाचे शिकू शकते”, असे शालोम म्हणाले.

इस्रायली नेत्यांची कृती धोकादायक पायंडा

२५ ऑगस्ट रोजी खान युनिस येथील नासेर रुग्णालयावर इस्रायलने बॉम्ब डागले. यामध्ये पत्रकारांसह सुमारे वीस लोक ठार झाले होते. काही तासांतच, आयडीएफचे प्रवक्ते, चीफ ऑफ स्टाफ आणि पंतप्रधान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी धावले होते. आयडीएफच्या प्रवक्त्याने “निरपराध नागरिकांना” इजा केल्याबद्दल इंग्रजीत माफी मागितली होती. चीफ ऑफ स्टाफनी तात्काळ चौकशीची घोषणा केली होती. तर, पंतप्रधानांनी या घटनेचा “दुःखद घटना” म्हणून उल्लेख करत याची सखोल चौकशी करण्याची घोषणा केली होती.

यावर टीका करताना शालोम म्हणाले, “या तीन नेत्यांची तीन वेगवेगळी विधाने केवळ आंतरराष्ट्रीय जनमत शांत करण्याची इच्छा दर्शवत नाहीत, तर त्या घटनेच्या परिणामांबाबतची अस्वस्थता आणि कदाचित भीतीसुद्धा व्यक्त करतात. या कृतीतून, या नेत्यांनी निष्पाप नागरिकांच्या मृत्यूसाठी काही अंशी जबाबदारी स्वीकारल्याचा संदेश गेला, जो आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने एक धोकादायक पायंडा ठरू शकतो.”

भारताकडून धडा

आपल्या लेखाच्या शेवटी शालोम यांनी म्हटले आहे की, “ट्रम्प यांच्या शाब्दिक हल्ल्यांना तोंड देत, मोदींनी माफी मागण्याची घाई केली नाही; त्याऐवजी, त्यांनी राष्ट्रीय सन्मान राखत जोरदार प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला. कदाचित त्यांचा दृष्टिकोन कठोर वाटला असेल, परंतु त्याने एक स्पष्ट संदेश दिला, भारत कोणाकडूनही अपमानास्पद वागणूक स्वीकारणार नाही.”