Benjamin Netanyahu announced Hamas Gaza chief Mohammad Sinwar killed : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी हमासचा गाझा प्रमुख आणि याह्या सिनवार याचा लहान भाऊ मोहम्मद सिनवार याला ठार करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
गाझा पट्टीतील राफा भागात ट्रेनी सैनिकांबरोबर झालेल्या लढाईत डोक्यात गोळी लागल्याने सात महिन्यापूर्वी याह्या सिनवार मारला गेला होता. त्यानंतर आता त्याच्या भावाला देखील ठार करण्यात आल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे.
इस्त्रायलवर करण्यात आलेल्या ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हा याह्या मानला जातो. हत्या होण्यापूर्वी गुप्तचर संस्था आणि इस्त्रायली डिफेन्स फोर्सकडून वर्षभरापासून याह्या याला लक्ष्य केले जात होत. भावाच्या मृत्यूनंतर गेल्या वर्षभरात हमासमध्ये मोहम्मद याचे नेतृत्व उदयास आले होते. दरम्यान मोहम्मद सिनवर याच्या मृत्यूबद्दल हमासने अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही.
मोहम्मद सिनवर याचा मृत्यू कसा झाला?
इस्त्रायली माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद याच्यावर दक्षिण गाझा भागात या महिन्याच्या सुरूवातीला इस्त्रायलकडून हवाई हल्ला करण्यात आला होता. या रिपोर्ट्सनुसार, १३ मे रोजी इस्त्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) खान युनिस येथील युरोपियन हॉस्पिटलच्या खालील लपण्यासाठी बनवलेल्या सुरूंगांना लक्ष्य करत मोठ्या प्रमाणात बॉम्ब टाकले होते.
आयडीएफने दावा केला आहे की हा हल्ला भूमिगत असलेल्या हमास कमांड अँड कंट्रोल सेंटरला लक्ष्य करत करण्यात आला होता. गेल्या काही आठवड्या करण्यात आलेल्या सर्वात भीषण हल्ल्यांपैकी एक असलेल्या या हल्ल्यात लागोपाठ एअर स्ट्राईक करण्यात आल्या. या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये रुग्णालयाच्या इमारतीतून धूराचे लोट उठताना पाहायला मिळाले होते, तसेच परिसरातील इतर इमारतींचेही नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले होते.