भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ‘इस्रोच्या जीएसएलव्ही मार्क ३’ (GSLV MK III) या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचे सोमवारी श्रीहरीकोट्यातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. जीएसएलव्ही मार्क ३ च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आता भारताला २.३ टनापेक्षा जास्त वजनाचे उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी परदेशात जाण्याची गरज राहणार नाही. तसेच या उपग्रह प्रक्षेपकाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भविष्यात भारतातूनच अंतराळवीर अवकाशात पाठवणे शक्य होणार आहे. हे उपग्रह प्रक्षेपक ‘जीसॅट-१९’ ला घेऊन अंतराळात झेपावले.

इस्रोसाठी सोमवारचा दिवस हा ऐतिहासिकच ठरला आहे. भारतातील सर्वात जास्त वजनदार ‘जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेइकल मार्क-३’ म्हणजेच ‘जीएसएलव्ही एमके-३’ या उपग्रह प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रह प्रक्षेपकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे वजन २०० हत्तींच्या वजनाएवढे आहे. या उपग्रह प्रक्षेपकामुळे भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली झाली आहे. ‘जीएसएलव्ही मार्क-३’मुळे भारताला ४ टन वजनापर्यंतचे उपग्रहदेखील अंतराळात पाठवता येतील. यापूर्वी भारताला फक्त २.३ टनापर्यंतचे उपग्रहच अंतराळात पाठवता येत होते.

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातील दुसऱ्या लाँच पॅडवरुन ‘जीएसएलव्ही मार्क ३’ हे जी सॅट १९ हे उपग्रह सोमवारी संध्याकाळी अवकाशात झेपावले. नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया मोहीमेसाठी हा उपग्रह महत्त्वाचा मानला जात आहे. जीसॅट-१९ उपग्रहाचे वजन ३,१३६ किलो असून सहा ते सात उपग्रहांचे काम एकटा जीसॅट १९ करु शकणार आहे. इस्रोच्या या मोहीमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरवरुन अभिनंदनही केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जीएसएलव्ही मार्क ३’शी निगडीत खास बाबी
– ६४० टन वजन, भारताचे आतापर्यंतचे सर्वात वजनदार उपग्रह प्रक्षेपक आहे
– ‘जीएसएलव्ही मार्क ३’ हे संपूर्ण भारतीय बनावटीचे उपग्रह प्रक्षेपक
– हा प्रकल्प पूर्ण करण्यास १५ वर्षे लागली. या महाकाय उपग्रह प्रक्षेपकाची उंची ही एका १३ मजली इमारती एवढी आहे. सुमारे ४ टनापर्यंत वजन वाहून नेण्याची या उपग्रहाची क्षमता आहे.
– आपल्या पहिल्या उड्डाणात हे उपग्रह प्रक्षेपक ३१३६ किलोग्रॅम सॅटेलाइट त्यांच्या कक्षेत पोहोचवेल.
– या उपग्रह प्रक्षेपकात स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार झालेले नवे क्रायोजेनिक इंजिन लावण्यात आले आहे. यामध्ये लिक्विड ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर केला जाणार आहे.