भारताने अंतराळात आणखी एक मोठे यश प्राप्त केले आहे. भारताचे संदेशवाहक उपग्रह जीसॅट-३१चे (GSAT-31) युरोपीयन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन रॉकेटने बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास फ्रेंच गयाना येथील अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणाच्या ४२ व्या मिनिटानंतर ३ वाजून १४ मिनिटांनी उपग्रह जिओ-ट्रान्सफ ऑर्बिटमध्ये स्थापित झाला. भारताने यापूर्वी अनेक उपग्रह फ्रेंच गयानातून प्रक्षेपित केले आहेत.

एरियनस्पेसने दिलेल्या माहितीनुसार, या रॉकेटमध्ये भारताच्या जीसॅट-३१ सह सौदी जियो स्टेशनरी उपग्रह १/ हेलास उपग्रह ४ यांचेही प्रक्षेपण करण्यात आले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सांगितलेल्या माहितीनुसार, या उपग्रहाचे वजन २५३५ किलोग्रॅम आहे. जीसॅट-३१ ४० वा संदेशवाहक उपग्रह आहे. यामुळे भू-स्थैतिक कक्षेत कू-बँड ट्रान्सपाँडर क्षमता वाढवेल. जीसॅट-३१ चा कार्यकाळ १५ वर्षे आहे.

जीसॅट-३१ आता भारताचा जुना संदेशवाहक उपग्रह इनसॅट-४ सीआरची जागा घेईल. प्रक्षेपणात कोणतीच समस्या आली नाही. जीसॅट ३१ इनसॅट उपग्रहाची जागा घेईल. या यशस्वी प्रक्षेपणासाठी एरियन स्पेस आणि इस्त्रोचे अधिकारी जे जानेवारीपासून येथे उपस्थित होते त्यांचे अभिनंदन अशा शुभेच्छा फ्रेंच गयाना येथे उपस्थित असलेले सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक एस पांडियन यांनी दिल्या.

जीसॅट ३१चा वापर व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंक, डिजिटल सॅटेलाईट, न्यूज गॅदरिंग, डीटीएच टेलिव्हिजन सर्व्हिस आणि इतर सेवांसाठी होईल. त्याचबरोबर हे उपग्रह आपल्या व्यापक बँड ट्रान्सपाँडरच्या मदतीने अरबी सागर, बंगालची खाडी आणि हिंद महासागराच्या विशाल समुद्री क्षेत्राच्यावर संदेशवहनासाठी विस्तृत कव्हरेज देईन.