लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना नेते मंडळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाषणे, आश्वासनांचा आधार घेत आहेत. असं असतानाच केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी मात्र जनतेच्या गरजा पूर्ण करणे हे देवालाही जमले नाही तर खासदार काय करणार असा सवाल एका सभेला संबोधित करताना उपस्थित केला आहे. बुलंदशहर येथील एका सभेमध्ये बोलताना शर्मा यांनी, ‘जनतेसाठी अन्न, वस्त्र आणि नोकरी देण्याचे जबाबदारी देवाची आहे’ असं मत व्यक्त केले आहे.

येथील भजन लाल मंदीर येथे एका सभेदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना खासदार जनतेच्या गरजा पूर्ण करु शकत नाही असं मत शर्मा यांनी नोंदवले आहे. ‘तुमच्या आणि माझ्यापेक्षा देवच जास्त वेडा आहे. कारण जर देवाने आपल्याला या भूतलावर पाठवले आहे तर आपल्यासाठी अन्न, वस्त्र, नोकरी देणे तसेच आपल्या मुलांना शिक्षण देणे ही देवाचीच जबाबदारी आहे,’ असं मत शर्मा यांनी व्यक्त केले आहे.

‘आजही पूर्व उत्तर प्रदेशमधील बालियासारख्या जिल्ह्यांसहीत इतर जिल्ह्यांमधील लोकांना योग्य प्रमाणात अन्नधान्य मिळत नाही. मुले जेव्हा शाळेत जातात तेव्हा शालेय पोषण आहाराअंतर्गत मिळणाऱ्या जेवणाने आपली पोटं भरतात. बाकी मुले उपाशीच असतात. जर आपली निर्मीती करणारा देवच आपल्या इच्छा पूर्ण करु शकत नाही तर एक खासदार ते कसं करणार?’, असा सवाल शर्मा यांनी उपस्थितांना केला.

शर्मा हे गौतम नगर मतदारसंघातून भाजपाचे खासदार म्हणून निवडूण आले आहेत. शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेली ही सभा १४ मार्च रोजी झाली असली तरी त्याचा व्हिडीओ आत्ता व्हायरल होताना दिसत आहे. विरोधी पक्षांनी शर्मा यांच्या वक्तव्यावरुन भाजपावर टिका केली आहे.

वादग्रस्त विधाने करण्याची शर्मा यांची ही पहिलीच वेळ नाही. १६ मार्च रोजी सिकंदराबाद येथे आयोजित एका सभेत बोलताना महेश शर्मा यांनी राहुल गांधी यांचा पप्पू तर प्रियंका गांधी यांचा ‘पप्पी’ म्हणून उल्लेख केला. ‘संसदेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागच्या बाकावर बसलो होतो. राहुल गांधींनी डोळा मारलेलं पाहून मीदेखील घायाळ झालो होतो. आता पप्पू म्हणतोय की मला पंतप्रधान व्हायचं आहे. आणि आता तर पप्पूची पप्पीदेखील आली आहे. म्हणजे आता मायावती, अखिलेश यादव, पप्पू आणि पप्पूची पप्पीदेखील आली आहे’, असं वक्तव्य महेश शर्मा यांनी यावेळी केलं होतं.