येथे मानसिक रूग्ण असलेल्या एका सॉफ्टवेअर अभियंत्याने तलवार घेऊन रस्त्यावर उतरत अनेकांवर हल्ला केला व त्यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात त्याच्या आईवडिलांचा व दोन पोलिसांचा समावेश आहे. नंतर त्याला रोखण्यासाठी पोलिसांना त्याच्यावर गोळीबार करावा लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
बलविंदर सिंग ऊर्फ बबलू हा करीमनगरमधील लक्ष्मीनगरचा रहिवासी असून त्याच्यावर मानसिक उपचार चालू होते. मुलकी सेवा परीक्षेत अपयश आल्याने त्याच्या मनावर परिणाम झाला होता, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक जे. रामाराव यांनी सांगितली. तो बंगळुरू येथील माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करीत होता व महिनाभर आईवडिलांसमवेत राहत होता. त्याने अनेकांवर हल्ला केला, नंतर त्याने स्वतलाही जखमी करून घेतले, काही वाहनांचे नुकसानही केले.