भारतीय मच्छिमारांना ठार करणाऱ्या इटलीच्या दोन नौसैनिकांवर खटला चालवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत इटलीने त्यांच्या भारतातील राजदूतास माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय अधिकाऱ्यांचे वर्तन अविश्वासार्ह व संदिग्ध आहे असे इटलीने म्हटले आहे.
नवी दिल्ली येथे सूत्रांनी सांगितले की, परराष्ट्र कामकाज विभागाला इटलीने राजदूत माघारी घेत असल्याची कल्पना दिलेली नाही, आम्ही आमच्या राजदूताला सल्लामसलतीसाठी माघारी बोलावत असू तर त्याची माहिती भारताच्या परराष्ट्र कामकाज खात्याला देण्याची गरज आम्हाला वाटत नाही असे इटलीने म्हटले आहे.
इटलीच्या परराष्ट्र मंत्री एम्मा बोनिनो यांनी सांगितले की, इटली सरकारने भारतातील राजदूत डॅनिएल मानसिनी यांना सल्लामसलतीसाठी माघारी बोलावले आहे. इटलीचे नौसैनिक साल्वातोर गिरोन, मॅसिमिलानो लॅटोरे यांच्यावरील खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २४ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केल्यानंतर इटलीने राजदूतांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला. आज या प्रकरणी सुनावणी होणार होती. बोनिनो यांनी सांगितले की, आमच्या नौसैनिकांना सोडवून मायदेशी आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. एक सार्वभौम देश म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांना असलेल्या हक्कांच्या बाबत वचनबद्धता दाखवण्यासाठी प्रयत्न जारी राहतील. नौसैनिकांचा प्रश्न हाताळणारे इटली सरकारचे दूत स्टॅफन द मिस्तुरा यांनी सांगितले की, थोडय़ाच काळात इटली याबाबत निर्णय घेईल.
इटलीचे संरक्षण मंत्री मारियो मॉरो यांनी राजदूतांना माघारी बोलावण्याच्या निर्णयाचे समर्थन केले असून आमच्या जनतेच्या भावना आम्ही यातून व्यक्त केल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.