जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांकडून दोन मोठे हल्ले करण्यात आले. आज सकाळी पूँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची घटना ताजी असतानाच कुलगाम परिसरात दहशतवाद्यांनी पैसे घेऊन जात असलेल्या बँकेच्या गाडीवर हल्ला चढवला. कुलगाममधील जम्मू आणि काश्मीर बँकेची ही गाडी होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पाच पोलीस कॉन्स्टेबल आणि दोन बँक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. दक्षिण काश्मीरचे डीआयजी उप एस.पी.पानी यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांना गाडीतून बाहेर खेचून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर या दहशतवाद्यांनी तब्बल ५० लाख रुपये आणि पाच रायफल्स घेऊन पळ काढला.

जम्मू आणि काश्मीर बँकेच्या कुलगाम शाखेबाहेर कॅश व्हॅनला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराचे जवान, निमलष्करी दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्पूर्वी आज सकाळी पाकिस्तानी सैन्याने कृष्णा घाटी सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर जोरदार हल्ला चढवला. यामध्ये दोन भारतीय जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. आज सकाळी ८.३० वाजल्यापासून पाकिस्तानचा गोळीबार सुरू आहे. गोळीबार सुरू असतानाच पाक सैन्याने भारतीय जवानांच्या दिशेने रॉकेटचा माराही केला. यावेळी जखमी झालेल्या पाच जवानांपैकी दोन जवानांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानने सीमारेषेवर २२८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. तर गेल्या महिन्यात सातवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते. गेल्या काही काळात केरनी सेक्टरमध्ये घुसखोरीच प्रमाण वाढले आहे. या परिसरात सीमारेषेपलीकडे दहशतवाद्यांचे अनेक तळ असून ते सातत्याने या भागातून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असतात. गेल्या महिन्याभरात अनेकदा या भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. एप्रिल महिन्यात या परिसरात झालेल्या एका स्फोटात एका भारतीय जवानाचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी ही स्फोटके पेरली होती. या भागातील भारतीय लष्कराचा वाढता पहारा पाहून हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये परतले असावेत, असा अंदाज आहे.

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याने हा तणाव आणखीनच वाढला आहे.