scorecardresearch

पुरीत आज निघणार जगन्नाथाची रथयात्रा; लाखो भाविकांची गर्दी

जगन्नाथाचा रथ तेथे असलेल्या गुंडिचा देवीच्या मंदिराकडे रवाना होईल.

पुरीत आज निघणार जगन्नाथाची रथयात्रा; लाखो भाविकांची गर्दी
फोटो सौजन्य : एएनआय

ओदिशाच्या तीर्थ नगरी पुरीत भगवान जगन्नाथाची रथयात्रा आजपासून (गुरूवार) सुरू होणार आहे. दरम्यान, यासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून भाविकांच्या सुरक्षेसाठीही योग्य ती पावले उचलण्यात आली आहेत. या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी जगभरातून लाखो भाविक याठिकाणी येत असतात. तसेच पुरी व्यतिरिक्त देशभरातील निरनिराळ्या ठिकाणी प्रतिकात्मक रूपातही या रथयात्रेचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील गुरूवारी अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. तसेच या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर पुरी येथील समुद्रकिनाऱ्यावर वाळू कलेचा उत्तम नमूनाही साकारण्यात आला आहे.

आज जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर जगन्नाथाचा रथ तेथे असलेल्या गुंडिचा देवीच्या मंदिराकडे रवाना होईल. वर्षातून एकदा भगवान जगन्नाथ हे आठवड्याभरासाठी गुंडिचा देवीकडे वास्तव्यास जातात, असे म्हटले जाते. आज संध्याकाळी 4 वाजता ही रथयात्रा सुरू होणार आहे. दरवर्षी आषाढ शुक्ल पक्ष द्वितीयेला या रथयात्रेचे आयोजन करण्यात येते. तसेच शुक्ल पक्षाच्या 11 दिवशी भगवान जगन्नाथ आपल्या घरी परतेपर्यंत भाविक मनोभावे जगन्नाथाची सेवा करत असतात. गेल्या अनेक महिन्यांपासून या रथयात्रेची तयारी सुरू असून यासाठी विशेष रथही तयार करण्यात आले आहेत. वसंत पंचमीपासूनच विशेष रथ तयार करण्याचे काम सुरू करण्यात येते. लिंबाच्या झाडाच्या लाकडापासून हे रथ तयार करण्यात येतात. तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारच्या धातूचा उपयोग केला जात नाही.

भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांचे तीन रथ तयार करण्यात आले असून ते आपल्या निर्धारित ठिकाणी पूजेसाठी पाठवण्यात आले आहेत. भगवान जगन्नाथाची ही 142 वी रथयात्रा असेल. या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलली आहेत. तसेच रथयात्रेतील प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच ओदिशातील श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने (एसजेटीए) या रथयात्रेविषयी आणि रथयात्रेच्या इतिहासाविषयी माहिती देण्यासाठी एक वेबसाइटदेखील सुरू केली आहे. मंगळवारी ही वेबसाइट सुरूवात करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या