Jagdeep Dhankhar Writes Letter To Vice President CP Radhakrishnan: जगदीप धनखड यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यापासून त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. याचबरोबर त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून अंतर ठेवले होते. त्यामुळे विरोधी पक्षांतील नेत्यांनी त्यांच्याबाबत अनेक दावे केले होते. मात्र, आता राजीनाम्याच्या ५० दिवसांनंतर जगदीप धनखड यांनी पहिल्यांदाच मौन मोडले असून, उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले आहे.
धनखड यांचे पत्र
राधाकृष्णन यांचे अभिनंदन करताना जगदीप धनखड यांनी पत्रात लिहिले आहे की, “आदरणीय राधाकृष्णनजी, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. या प्रतिष्ठित पदावरील तुमची निवड आपल्या देशाच्या लोकप्रतिनिधींचा विश्वास आणि आत्मविश्वास दर्शवते. सार्वजनिक जीवनातील तुमचा प्रचंड अनुभव पाहता, तुमच्या नेतृत्वाखाली हे प्रतिष्ठित पद निश्चितच अधिक आदर आणि वैभव प्राप्त करेल. या महत्त्वाच्या प्रसंगी, तुमच्या यशस्वी कार्यकाळासाठी आणि आपल्या महान देशाच्या सेवेसाठी माझ्या शुभेच्छा.”
पंतप्रधानांची प्रतिक्रिया
दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सीपी राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले आहे. “सी. पी. राधाकृष्णन यांचे जीवन नेहमीच समाजाची सेवा करण्यासाठी आणि गरीब आणि उपेक्षितांना सक्षम करण्यासाठी समर्पित राहिले आहे. ते आपली संवैधानिक मूल्ये मजबूत करतील आणि संसदीय संवाद पुढे नेतील”, असे पंतप्रधान मोदींनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे.
काँग्रेसची प्रतिक्रिया
दुसरीकडे काँग्रेसने असा दावा केला आहे की, भाजपाने संख्येच्या बाबतीत उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली असली तरी प्रत्यक्षात ते नैतिक आणि राजकीयदृष्ट्या पराभूत झाले आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सांगितले की, विरोधी पक्ष एकजूट राहिले आणि त्यांची कामगिरी कौतुकास्पद होती.
जयराम रमेश यांनी एक्स वर पोस्ट केले की, “उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष एकजूट राहिला. त्यांची कामगिरी कौतुकास्पद होती. उमेदवार न्यायमूर्ती (निवृत्त) बी. सुदर्शन रेड्डी यांना ४० टक्के मते मिळाली. २०२२ च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाला २६ टक्के मते मिळाली होती.”
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली. तर विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या निवडणुकीत इलेक्टोरल कॉलेजच्या एकूण ७८१ सदस्यांपैकी (एक पोस्टल मतपत्रिकेतून) ७६७ जणांनी मतदान केले होते. त्यापैकी १५ मते अवैध घोषित करण्यात आली होती.