केंद्र सरकारची हिंमत असेल तर त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करूनच दाखवावी, या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी टीका केली आहे. ‘बॅनर्जी यांना वाटते तितके केंद्र सरकार बेजबाबदार नाही’, अशी प्रतिक्रिया रमेश यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकार घटनेस अनुसरून चालते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना वाटते तितके ते काही बेजबाबदार नाही. केवळ मुख्यमंत्री आव्हान देतात म्हणून लगेच घटनेतील कलम ३५६ चा वापर करून पश्चिम बंगाल सरकारविरोधात ते लागू केले जाईल असे नाही, असे रमेश यांनी स्पष्ट केले. घटनेतील कलमाचा एवढय़ा उथळपणे वापर केला जावा असे आपले मत नाही, असेही ते म्हणाले. राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राजवट होती तेव्हा याच ममता बॅनर्जी राज्यात ३५६ वे कलम लागू करण्याची मागणी रोजच्या रोज करीत होत्या, याचीही आठवण रमेश यांनी करून दिली.
केंद्र सरकार राज्याची आर्थिक नाकेबंदी करीत असल्याच्या बॅनर्जी यांच्या आरोपाचाही रमेश यांनी समाचार घेतला. आपण जे काही शब्द वापरत असतो, त्यांचा नेमका अर्थ काय आहे हे ममता यांना ठाऊक नाही, असे दिसते, असा टोमणा रमेश यांनी मारला. गेल्या महिनाभरात ग्रामीण विकास मंत्रालयाने राज्यात मनरेगा अंतर्गत २,४०० कोटी रुपये तर १,२०० किलोमीटरचे रस्ते मंजूर केले आहेत. त्यामुळे ही आर्थिक नाकेबंदी असू शकते काय, अशी विचारणा रमेश यांनी केली. जे लोक मुख्यमंत्रीपदी निवडून येतात त्यांनी आपल्या पदाची शान ठेवून भाषेचा वापर केला पाहिजे. ‘आर्थिक नाकेबंदी’ सारखे शब्द मुख्यमंत्रीपदास शोभा देत नाहीत, असा सल्ला त्यांनी दिला.
२०१४ च्या निवडणुकांनंतर ‘युपीए-३’ शिल्लक रहाणार नाही, या ममताजींच्या भाकितावरून त्या आता भविष्यवेत्त्या झाल्या आहेत असे वाटते कारण त्या कविता करतात, चित्रकार आहेत, असे आपण ऐकले होते. परंतु त्या आता भविष्यवेत्त्या केव्हा झाल्या, अशी विचारणा रमेश यांनी केली.
लोकांनी मोठय़ा आशा मनाशी बाळगून तृणमूल काँग्रेसला सत्तारूढ केले परंतु लोकांच्या आशाआकांक्षांना त्यांनी चूड लावली असून लोकांची पूर्णपणे फसवणूक केली आहे. राज्यातील आगामी पंचायत निवडणुकीत त्याचे प्रत्त्यंतर येऊन तृणमूल काँग्रेसच्या शेवटाची ती सुरूवात असेल, असा इशारा रमेश यांनी दिला.
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2013 रोजी प्रकाशित
जयराम रमेश यांची ममतांवर टीका
केंद्र सरकारची हिंमत असेल तर त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करूनच दाखवावी, या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी टीका केली आहे. 'बॅनर्जी यांना वाटते तितके केंद्र सरकार बेजबाबदार नाही', अशी प्रतिक्रिया रमेश यांनी …
First published on: 31-05-2013 at 06:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jairam rameshs comments on mamata