बीजिंग : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे समपदस्थ वांग यी यांची गुरुवारी बाली येथे बैठक झाली. या वेळी चीनने सांगितले की, सीमेवर स्थिती ‘स्थिर’ आहे. दोन्ही देशांकडे सीमा भागात शांती आणि स्थैर्य कायम ठेवण्याची क्षमता आहे.

जयशंकर यांनी इंडोनेशियातील बाली येथे वांग यांच्याबरोबर चर्चा केली. या वेळी विशिष्ट प्रलंबित मुद्दय़ांना महत्त्व दिले. लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेसंबंधी प्रलंबित मुद्दय़ावर तात्काळ मार्ग काढण्याच्या आवश्यकतेकडे जयशंकर यांनी वांग यांचे लक्ष वेधले. द्विपक्षीय संबंध हे परस्पर सन्मान, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हितांच्या आधारावर असावेत, यावर भर दिला.

जयशंकर-वांग यांच्या बैठकीबाबत चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, योग्य वेळी या संदर्भातील माहिती देण्यात येणार आहे. ‘‘मीसुद्धा या बैठकीवर लक्ष ठेवून आहे. कृपया अधिक माहितीसाठी प्रतीक्षा करा,’’ असेही त्यांनी सांगितले.

 ‘‘जयशंकर यांच्या प्रासंगिक मतांवर आम्ही लक्ष दिले आहे. भारत आणि चीन सीमेवरील स्थिती स्थिर आहे, असे  मत आहे,’’ असे लिजियान यांनी सांगितले. भारत- चीन हे परस्परांचे महत्त्वाचे शेजारी आहेत. दोन्ही देशांकडे सीमेवर शांती कायम ठेवण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी सांगितले.