जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे सुरक्षादलाने गुरुवारी सकाळी दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. सुरक्षादलाला या परिसरात काही अतिरेकी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली. शोध मोहिमेवेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. सुरक्षादलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत सुरक्षादलाला दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. दरम्यान, दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर स्थानिकांनी सुरक्षादल आणि माध्यम प्रतिनिधींवर दगडफेक केली. यामध्ये ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून बडगाम आणि परिसरात दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे या परिसरात सुरक्षादलाकडून सातत्याने शोध मोहीम राबवण्यात येते. दक्षिण काश्मीरमधील त्राल येथे मंगळवारी झालेल्या भीषण चकमकीत सुरक्षादलांनी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहरचा भाचा उस्मान हैदरसह दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमक स्थळावरुन एम-४ कार्बाइन जप्त करण्यात आली. उस्मानशिवाय दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव शौकत अहमद खान असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, सोपोरमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने मागील आठवड्यात शुक्रवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यापूर्वी काश्मीर खोऱ्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत ६ दहशतवादी मारले गेले होते. याचदरम्यान नौगाम येथे शुक्रवारी रात्री उशिरात दहशतवाद्यांनी सीआयएसएफच्या एका जवानावर ग्रेनेडने हल्ला केला होता. या हल्ल्यात एएसआय राजेशकुमार शहीद झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu and kashmir 2 terrorists have been killed in the encounter which broke out at budgam
First published on: 01-11-2018 at 09:54 IST