जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात एका २४ वर्षीय महिलेने सीआरपीएफ जवानांवर डांबून ठेवणे आणि एका जवानावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर तीन जवानांचं निलंबन करण्यात आलं आहे. ही महिला पूंछ जिल्ह्यातील मंडी येथील असून तिने शनिवारी डोमाना येथील पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून आरोपी जवानांविरोधात एफआआयआर दाखल करण्यात आला आहे.

महिलेने केलेल्या पोलीस तक्रारीनुसार, १० मार्च रोजी सीआरपीएफच्या तीन कर्मचा-यांनी मला रोखलं आणि छावणीमध्ये घेऊन गेले. मी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बसमधून उतरून माझ्या नातेवाईकाच्या घरी निघाले होते. पण मी रस्ता चुकले होते, अर्ध्या तासानंतर सीआरपीएफच्या गणवेशातील तीन कर्मचा-यांनी मला त्यांच्या छावणीच्या बाहेर हटकले. मदतीच्या हेतूने त्यांनी मला छावणीच्या आत नेले व त्यांच्यापैकी एकाने माझ्यावर बलात्कार केला. अत्याचाराचे चित्रीकरण करून पोलिसांना किंवा इतर कोणाला सांगितल्यास समाजमाध्यमांवर व्हिडिओ टाकण्याची धमकीही आरोपींनी दिली, असा आरोपही तिने केला.

तिन्ही सीआरपीएफ जवानांचं निलंबन करण्यात आलं असून आम्ही पोलीस चौकशीत संपूर्ण सहकार्य करत आहोत, अशी माहिती सीआरपीएफचे प्रवक्ता आशीष कुमार झा यांनी दिली.