घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या ‘जैश- ए- मोहम्मद’च्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची घटना ताजी असतानाच भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यालाही दणका दिला आहे. सोमवारी भारतीय सैन्याच्या कारवाईत पाक सैन्यातील सात सैनिक ठार झाले. पाकमधील कोटली सेक्टर येथे भारतीय सैन्याने ही कारवाई केली.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या असून नववर्षातही शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना वाढल्या आहेत. सोमवारी भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानमधील कोटली सेक्टर येथील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर भारतीय सैन्याने गोळीबार केला. यात पाकचे चार जवान ठार झाले.
दरम्यान, भारतीय लष्कराने २०१७ मध्ये पाकिस्तानच्या १३८ जवानांना डावपेचात्मक कारवाई तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमावर्ती गोळीबारात ठार केल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. भारतीय लष्कराने शस्त्रसंधी उल्लंघन व दहशतवादी कारवायांविरोधात गेल्या एक वर्षांत कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षभरात भारतीय सैन्याच्या गोळीबारात पाकचे १३८ जवान मारले गेले तर १५५ जवान गंभीर जखमी झाले होते.
सोमवारी भारताने घुसखोरी करणाऱ्या ‘जैश-ए- मोहम्मद’च्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यामुळे शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकला लष्कराने दुहेरी दणका दिला.
Four Pakistan Army soldiers killed along LOC in Jandrot, Kotli sector: Pakistan Army statement
— ANI (@ANI) January 15, 2018