आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात आणलेल्या पाकिस्तानी कैद्याने केलेल्या गोळीबारात जम्मू- काश्मीर पोलीस दलातील एका जवानाचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर पाकिस्तानी कैद्याने तिथून पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

जम्मू- काश्मीरमधून अटक करण्यात आलेल्या सहा पाकिस्तानी नागरिकांना तपासणीसाठी श्रीनगरमधील महाराजा हरीसिंह रुग्णालयात आणले होते. यादरम्यान नावीद नामक कैद्याने पोलिसांच्या हातातील बंदुक खेचून अंदाधूंद गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. यातील एका पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमी पोलिसाची प्रकृती गंभीर आहे.

अबू हनझूला उर्फ नावीद असे या कैद्याचे नाव असून काही महिन्यांपूर्वी त्याला शोपियन जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. नावीद हा पाकिस्तानी नागरिक असून सीमारेषा ओलांडून त्याने भारतात घुसखोरी केल्याचा आरोप होता. नावीदचा कसून शोध घेतला जात आहे. सुरुवातीला दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे वृत्त होते. मात्र, काही वेळाने पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. रुग्णालयात आणलेल्या कैद्यानेच हा गोळाबार केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. नावीदचा कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध होता का याचा तपासही सुरु आहे.

सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी काकपोरा येथील लष्करी तळावर ग्रेनेड हल्ला केला. यात जीवितहानी झाली नव्हती. ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. यापाठोपाठ रुग्णालयातील गोळीबाराच्या वृत्ताने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.