जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा तसेच ३७० नुसार केलेल्या सर्व अन्य दुरुस्त्या गैरलागू करण्याच्या शिफारशीचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत मांडला होता. राज्यसभेनंतर लोकसभेतही हे ऐतिहासिक विधेयक मंजूर झालं. दोन्ही सभागृहात विधेयकावर वादळी चर्चा झाली. मात्र यावेळी सर्वांचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे होतं. लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आता दोन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरच्या निर्णयावर देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान २७ मार्च रोजी देशाला शेवटचं संबोधित केलं होतं. ‘मिशन शक्ती’च्या अंतर्गत लो अर्थ ऑर्बिटमध्ये भारतानं एक लाईव्ह सॅटेलाईट नष्ट केलं असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक राज्यसभेनंतर लोकसभेतही मंजूर झालं. ३५१ विरुद्ध ७२ मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आलं. यावेळी जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचं विधेयकही ३६६ विरुद्ध ६६ मतांनी मंजूर करण्यात आलं. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने सोमवारी उचलले. त्याचबरोबर राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. या निर्णयानंतर विरोधकांकडून जोरदार टीका सुरु झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याची शक्यता आहे.
काश्मीरमधून ३७० कलम हद्दपार, राज्यसभेनंतर लोकसभेतही ऐतिहासिक विधेयक मंजूर
अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा तसेच ३७० नुसार केलेल्या सर्व अन्य दुरुस्त्या गैरलागू करण्याच्या शिफारशीचा प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेला होता मात्र, त्याआधीच राष्ट्रपतींनी अधिसूचना काढली. त्यामुळे या प्रस्तावावरील चर्चा ही निव्वळ औपचारिकता ठरली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत विधेयक मांडत ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करत असल्याची माहिती दिली होती. राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आलं. यावेळी मोठ्या फरकाने लोकसभेत विधेयक मंजूर झालं असून काश्मीरमधून ३७० कलम हद्दपार झालं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी सकाळी अधिसूचना जारी करीत ‘अनुच्छेद ३७०’ रद्द केला. अनुच्छेद ३७० पूर्णत: संपुष्टात आणलेले नाही. त्यातील उपकलम १ कायम असून त्याद्वारे या अनुच्छेदातील अन्य सर्व विशेष लाभ राष्ट्रपतींनी विशेषाधिकारानुसार रद्द करण्यात केले आहेत. अनुच्छेद ३७० रद्द झाल्याने याच अनुच्छेदाचा आधार घेऊन १९५४मध्ये लागू केलेला अनुच्छेद ३५-अ देखील आता घटनाबाह्य़ ठरला. त्यामुळे राज्याबाहेरील नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करता येणार आहे. आर्थिक दुर्बलांसाठी लागू होणारे दहा टक्के आरक्षणही आपोआप लागू होईल. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट असल्याने हे विधेयक तेथील विधानसभेऐवजी संसदेत मांडण्यात आले.