जम्मू – काश्मीरच्या दौऱ्यावर आलेले संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लष्कराच्या जवानांशी संवाद साधला. शत्रूच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांचे कौतुक करून त्यांचा आत्मविश्वास वाढवला. उत्तर काश्मीरमधील रामपूर सेक्टरमधील सीमेवरील चौक्यांनाही त्यांनी भेट दिली. शत्रूला सडेतोड उत्तर देण्याची जवानांमध्ये जबरदस्त इच्छाशक्ती आहे, अशा शब्दांतही त्यांनी जवानांचे कौतुक केले.

बारामुल्ला विभागाचे मेजर जनरल आर. पी. कलिता यांच्यासोबत संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी लष्कराच्या चौक्यांना भेट दिली. त्यांनी जवानांशी संवाद साधला. जवानांचे धैर्य, दृढ संकल्प आणि निस्वार्थ सेवेचे कौतुक केले. तुम्ही किती कठिण परिस्थितीत काम करत आहात हे संपूर्ण देशाला माहिती आहे आणि संपूर्ण देश तुमच्या पाठिशी आहे, असे सांगून जेटली यांनी जवानांना बळ दिले. देशहितासाठी देशविरोधी कारवाया आणि शत्रूच्या नापाक मनसुब्यांना उधळून लावण्यासाठी कायम सतर्क राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. शत्रूच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची जवानांची आक्रमक इच्छाशक्ती खूपच समाधानकारक आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरण आणि सीमेपलिकडून शस्त्रसंधीच्या वाढत्या घटनांमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे. तसेच देशातील शांतता भंग करण्यासाठी घुसखोरीचे प्रमाणही वाढत आहे. लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचे हे प्रयत्न अनेकदा हाणूनही पाडले आहेत. काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी पुँछ जिल्ह्यात दोन भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली होती. त्यानंतर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असे सांगून बदला घेण्याचे संकेतही लष्करप्रमुखांनी दिले होते. तसेच संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनीही जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही, असे सांगून पाकिस्तानला इशाराच दिला होता. त्यानंतर बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीतही शत्रूच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज राहा, अशा सूचनाही लष्कराच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.