जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात बुधवारी रात्री ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. या पावसामुळे अनेकांच्या घरांचे व दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. बचावकार्य व बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठठरी शहरात बुधवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरे यामध्ये कोसळली. घरांच्या ढिगाऱ्याखाली तीन मृतदेह सापडले. दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले. अजूनही बचाव कार्य सुरू आहे. सुमारे ६ घरे आणि ४ दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.

जम्मू येथील डोडा परिसरात यंदा मुसळधार पाऊस पडत असल्याने त्याचा जनजीवनावर प्रभाव पडला आहे. यापूर्वी घर वाहून गेल्याने एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला होता. रामबन जिल्हा वाहतूक पोलिसांनी भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग पुढील सुचना मिळेपर्यंत बंद केला आहे. जम्मू-काश्मीरच नव्हे तर ओडिशा, आसाम आणि मणिपूर राज्यातही अशीच परिस्थिती कायम असून तेथील नागरिकांनाही भूस्खलनाला सामोरे जावे लागत आहे.

दुसरीकडे आसाममध्ये पूर आल्यामुळे आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम राज्याच्या आपत्ती निवारण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ जुलैपर्यंत १७ जिल्ह्यातील सुमारे ७,६४,००० लोक प्रभावित झाले असून ६५ जणांचा मृत्यू झाला आहे.