करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली वैष्णोदेवी यात्रा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर प्रशासनानं १६ ऑगस्टपासून वैष्णोदेवी यात्रा सुरू करण्याची परवानगी दिली होती. देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मार्च महिन्यातच वैष्णोदेवीची यात्रा बंद करण्यात आली होती. दरम्यान, आता या यात्रेला परवानगी देण्यात आली असून पहिल्या आठवड्यात दररोज २ हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यापैकी १ हजार ९०० भारतीय आणि १०० परदेशी भाविकांना परवानगी दिली जाईल.

जम्मू काश्मीर प्रशासनानं या यात्रेसाठी अनेक नियम तयार केल्याची माहिती श्राईन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांनी दिली. यात्रेदरम्यान भाविकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क परिधान करण्यासारख्या नियमांचं कठोर पालन करावं लागणार आहे. याव्यतिरिक्त सर्व भाविकांचे प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंगही करण्यात येणार असून भाविकांच्या त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं अनिवार्य असणार असल्याची माहितीही देण्यात आली.

“६० वर्षांवरील व्यक्ती, आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला आणि १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश दिला जाार नाही. परिस्थिती सुधारल्यानंतर या नियमांची समिक्षा केली जाईल. तसंच ऑनलाइन नोंदणी केल्यानंतत भाविकांना यात्रेची परवानगी देण्यात येईल,” असंही रमेश कुमार यांनी सांगितलं. याव्यतिरिक्त भवनामध्ये ६०० पेक्षा अधिक लोकांना जमा होण्याची परवानगी नसेल. जम्मू काश्मीर प्रशासनाच्या या मार्गदर्शक सूचना ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहेत. याव्यतिरिक्त भाविकांना देवीकडे काहीही अर्पण करता येणार नाही. तसंच देवीदेवतांच्या मूर्तींनाही हात लावता येणार नाही.