पाकिस्तानी सैन्याकडून मंगळवारी पुन्हा एकदा सीमाभागात गोळीबार करण्यात आला. पुंछ जिल्ह्यातील सीमेनजीकच्या फोरवर्ड पोस्टवर उखळी तोफांनी हा हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी सैन्याच्या या कृत्याला भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिले.

या घटनेबाबत एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले, पाकिस्तानी लष्कराकडून सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कृष्णा घाटीत विनाकारण अंदाधुंद गोळीबार सुरु केला. यामध्ये लहान शस्त्रे आणि स्वयंचलित मॉर्टर्सचा समावेश होता. तसेच उखळी तोफांचाही त्यांनी मारा केला. पाकिस्तानी सैन्याच्या या कृत्याला भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिले.

या अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याकडून अशा प्रकारे भारतीय हद्दीत गोळीबार करण्याच्या घटना सातत्याने घडत असून या वर्षी ६५० वेळा अशा घटना घडल्या आहेत.

पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि वाढत्या कारवाया लक्षात घेता आता त्यांच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर दिले पाहिजे हाच एक पर्याय आता उरला आहे असे मत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतेच नोंदवले होते.

सर्जिकल स्ट्राइक केला तरीही त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. भारताविरोधात पाकिस्तानच्या कारवाया थांबताना दिसत नाहीत. पाकिस्तान अजूनही भारतात दहशतवादी पाठवत आहे. त्यांच्या गोळ्यांमुळे निष्पाप लोकही मारले जात आहेत. हे आता कदापी सहन केले जाणार नाही असेही शहा यांनी स्पष्ट केले होते.