जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये ३५ वर्षांपूर्वी एका काश्मीरी पंडित नर्सचे अपहरण करून नंतर तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा आता नव्याने तपास सुरू करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सोमवारी रात्री श्रीनगरमध्ये आठ ठिकाणी छापा टाकला आहे. सरला भट असे हत्या करण्यात आलेल्या २७ वर्षीय काश्मीरी पंडित नर्सचे नाव आहे. तिने काश्मीर खोऱ्यात काश्मीरी पंडितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला होता तसेच दहशतवाद्यांना खुले आव्हान दिले होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी तिचे अपहरण करून निर्दयीपणे हत्या केली होती.
तीन दशकांपूर्वी झालेल्या या हत्या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी सोमवारी रात्री जम्मू काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमध्ये आठ ठिकाणी छापे टाकले. नर्स सरला भट या श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SKIMS) येथील हब्बा खातून हॉस्टेल मध्ये वास्तव्यास होत्या. या हॉस्टेलमधून १८ एप्रिल १९९० रोजी दहशतवाद्यांनी सरला भट यांचे अपहरण केले होते. त्यांनतर त्यांच्यावर बेछुट गोळीबार करण्यात आला. सरला भट यांचा मृतदेह मल्लाबाग येथील उमर कॉलनी परिसरात आढळला होता. जम्मू काश्मीर पोलिसांच्या सूत्रांनी या हत्या प्रकरणाशी संबंधित ही माहिती दिली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
हॉस्टेलमधून अपहरण… मग हत्या
जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरी पंडित सरला भट यांचे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर त्यांची निर्दयीपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सरला भट या पोलिसांना माहिती पुरवतात असा संशय दहशतवाद्यांना होता. दहशतवाद्यांनी सरला भट यांच्या मृतदेहावर ‘पोलिसांची हस्तक’ असल्याची चिठ्ठी टाकली होती. त्यावेळी निगिन पोलीस ठाण्यात या हत्या प्रकरणाची एफआयआर नोंद करण्यात आली होती. परंतु, त्यावेळी कोणताही तपास झाला नाही. सरला भट यांच्या हत्येत सहभागी असलेल्यांचा शोध देखील घेण्यात आला नव्हता.
सरला भट यांचा दहशतवाद्यांशी लढा
१९९० सुमारास काश्मीर खोऱ्यात दहशतवाद फोफावला होता. त्यावेळी तेथील काश्मीरी पंडितांना नोकऱ्या तसेच काश्मीर सोडून जाण्याचे आवाहन दहशतवादी संघटनांनी केले होते. त्यात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट ही दहशतवादी संघटना आघाडीवर होती. मोठ्या प्रमाणात काश्मीरी पंडित काश्मीर खोरे सोडून जात होते. त्यावेळी सरला भट यांनी दहशतवाद्यांना खुले आव्हान देत लढा उभा केला होता. काश्मीर पंडितांनी नोकऱ्या व घर सोडून जाऊ नये असे जाहीर आवाहन सरला भट यांनी काश्मीरी पंडितांना केले होते. त्यामुळे दहशतवाद्यांनी सरला भट यांची हत्या केली, असे जम्मू काश्मीर पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले आहे. सरला भट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला देखील धमक्या मिळत होत्या. तसेच सरला यांच्या अंत्यविधीला देखील जाऊ नये अशी देखील धमकी कुटुंबाला देण्यात आली होती.
दरम्यान, मागील वर्षी सरला भट यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. हे प्रकरण जम्मू काश्मीर पोलीसांच्या विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले आहे. सरला भट यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच त्यांच्या हत्येत सहभागी असलेल्या दोषींना शिक्षा मिळावी म्हणून पुन्हा तपास सुरू करण्यात आला आहे. हत्येशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी काल (सोमवारी) रात्री उशीरा श्रीनगरमध्ये आठ ठिकाणी छापा टाकला. १९९० मध्ये झालेल्या या हत्या प्रकरणाशी संबंधित दहशतवाद्यांना कठोर शिक्षा मिळावी म्हणून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.