जम्मू-काश्मीरच्या त्राल सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. त्राल येथे दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर भारतीय सैन्य दल, स्थानिक पोलीस आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या पथकांनी संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली. त्रालमधील एका परिसरात शोधमोहिम सुरू असताना दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला. गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलानेही गोळीबार केला. त्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा पथकाला यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला असता सुरक्षा पथकांनी त्यांना शरण येण्यास सांगितलं होते. पण परिस्थिती नियंत्रणात आली नाही. दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार सुरू राहिला. त्यामुळे सुरक्षा पथकाने दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले आणि तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

ठार झालेले दहशतवादी हे नव्यानेच दहशतवादी संघटनेत सामील झाले होते. एक जण गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तर इतर दोन दहशतवादी जानेवारी महिन्यात संघटनेत सामील झाले होते. शोधमोहीम सुरू असताना एका घरमालकाने त्याच्या घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती दिली. त्यानंतर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, अशी माहिती विजय कुमार यांनी दिली. या दहशतवाद्यांकडे एके-४७, पिस्तुल आणि ४ ग्रेनेड असा साठा सापडला.

दरम्यान, जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला त्रालमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात आठ स्थानिक आणि एक जवान जखमी झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu kashmir three terrorists killed in the encounter at mandoora tral area of awantipora vjb
First published on: 29-01-2021 at 21:43 IST