scorecardresearch

यात्रेकरुंसह पर्यटकांना तात्काळ काश्मीर सोडण्याची सूचना, अमरनाथ यात्रा स्थगित

जम्मू काश्मीर सरकारकडून अमरनाथ यात्रेकरु आणि पर्यटकांना तात्काळ काश्मीर सोडण्याची सूचना करण्यात आली आहे

(PTI Photo)

जम्मू काश्मीर सरकारकडून अमरनाथ यात्रेकरु आणि पर्यटकांना तात्काळ काश्मीर सोडण्याची सूचना करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असून जम्मू काश्मीर सरकारने यात्रेकरु आणि पर्यटकांना पुन्हा परतण्यासाठी व्यवस्था करत तात्काळ काश्मीर सोडा अशी सूचना केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने अमरनाथ यात्रा १३ दिवस आधीच रोखण्यात आली आहे.

अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सापडलं पाक लष्कराचं भुसुरुंग आणि स्नायपर रायफल

मिळालेल्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेच्या मार्गावर पाकिस्तानी भुसुरुंग आणि स्नायपर रायफल सापडल्यानंतर हा निर्णय़ घेण्यात आला आहे. अमरनाथ यात्रा १५ ऑगस्टपर्यंत म्हणजेच रक्षाबंधनपर्यंत चालणार होती. पण हवामान बिघडल्याने आणि दहशतवादी हल्ल्याची भीती असल्याने यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाच्या सचिवांनी गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आदेश जारी केला असून दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. “गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली असून अमरनाथ यात्रेला टार्गेट केलं जाऊ शकतं. काश्मीर खोऱ्यातील कायदा-सुव्यवस्था लक्षात घेता पर्यटक आणि अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी त्यांना लवकरात लवकर काश्मीर सोडून जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. परतत असताना योग्य ती काळजी घ्यावी”, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु होणार की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील आदेश येईपर्यंत अमरनाथ यात्रा स्थगित ठेवली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानी लष्कराचं समर्थन असणारे दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखत असल्याची खात्रीलायक माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळालं असल्याचं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं होतं. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर भुसुरुंग आणि स्नायपर रायफल सापडली असल्याची माहिती यावेळी लष्कराचे वरीष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लोन यांनी दिली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jammu kashmir tourist amarnath yatra valley intelligence report sgy