हाजीपूरमध्ये साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी बिहारमधील नितीशकुमार सरकारवर टीका केली आहे. अशा प्रकारच्या हत्येमुळे राज्यात पुन्हा जंगलराज आल्याचे आणि नितीशकुमार असहाय झाल्याचे स्पष्ट होत आहे, असेही पासवान यांनी म्हटले आहे.
बिहारमध्ये पोलीसच असुरक्षित आहेत, तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय, नितीशकुमार इतके असहाय का झाले आहेत आणि ते का गप्प राहिले आहेत, असे सवालही पासवान यांनी केले आहेत. पासवान हे हाजीपूरचे खासदार असून ते रविवारी मतदारसंघाचा दौरा करून स्थितीची पाहणी करणार आहेत. हाजीपूरमध्ये अशा प्रकारची तिसरी घटना घडली आहे, असेही ते म्हणाले.