जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. निवडणुकीपूर्वीच्या एका सभेमध्ये ते भाषण करत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आबे यांची छाती आणि मानेला गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आबे यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये शिंजो आबे जखमी झाल्याचे दिसत आहे.

हेही वाचा >>>> Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या; पाच तास मृत्यूशी अयशस्वी झुंज

पश्चिम जपानमधील नारा शहरामध्ये एका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ६७ वर्षीय आबे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावरील या सभेमध्ये आबे यांचं भाषण सुरु असतानाच मागून हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आबे यांच्यावरील हल्ला स्पष्टपणे दिसत आहे. गोळ्या झाडल्यानंतर आबे जमिनीवर कोसळल्याचेही दिसत आहे. हल्लेखोराने आबे यांना पाठीमागून लक्ष्य केले. त्यामुळे या हल्ल्यात काही समजायच्या आतच आबे यांना दोन गोळ्या लागल्या. आबेंवर हल्ला झाल्यानंतर सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले. हा सर्व घटनाक्रम या व्हिडीओमध्ये कैद करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>> काँग्रेस नेत्याने अग्निपथ योजनेशी जोडला शिंजो आबेंच्या मृत्यूचा संबंध; भाजपाला केलं लक्ष्य

शिंजो आबे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरचे नाव यामागामी तेत्सुआ असल्याचे समोर आले आहे. तो जपानमधील नौसेना म्हणजेच जपान मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्सचा (JMSDF) माजी सदस्य आहे. तेत्सुआने जपानमधील एका स्थानिक विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात पहिली गोळी आबे यांच्या छातीवर तर दुसरी गोळी मानेला लागली असून आबे यांचा मृत्यू झाला. सध्या आरोपी तेत्सुआ याला जपानी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा >>>> विश्लेषण : शिंजो आबेंवर गोळ्या झाडणारा तोमागामी तेत्सुआ कोण आहे? जाणून घ्या JMSDF म्हणजे नेमकं काय?

आबे यांच्यावर हल्ला नेमका कसा झाला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या माहितीनुसार आबे यांच्यावर हल्ला करण्यासाठी यामागामी तेत्सुआ याने हँडमेड बंदुकीचा वापर केला. जपानमध्ये शॉर्ट बॅरल शॉटगनचा परवाना मिळवण्याची प्रक्रिया चांगलीच किचकट आहे. त्यासाठी कठोर नियमावली आहे. त्यामुळे तेत्सुआ या आरोपीला ही बंदूक नेमकी कोठून मिळाली? याचा शोध घेतला जात आहे. आबे आज सकाळी जपानच्या नारा या भागात एका कार्यक्रमात भाषण करत होते. याच वेळी तेत्सुआ या आरोपीने आबे यांच्यावर मागून गोळीबार केला.