Donald Trump Tariffs: गेल्या चार महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफची चर्चा चालू आहे. दोन्ही राष्ट्रांमध्ये व्यापारासंदर्भातील करारांवर चर्चा चालू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र ती चर्चा पूर्ण व्हायच्या आधीच भारतावर टॅरिफ लागू केले. आधी २५ टक्के आणि नंतर हे टॅरिफ ५० टक्के करण्यात आले. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत त्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. मात्र, ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफची बाजारपेठेतील गुंतवणूकदारांनी चिंता करू नये, असं मत अमेरिकेतील आघाडीची वित्तविषयक कंपनी जेफरीजचे एक प्रमुख पदाधिकारी ख्रिस्तोफर वूड यांनी व्यक्त केलं आहे.

भारत विरुद्ध अमेरिका टॅरिफ वॉर!

काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने चीनविरोधात टॅरिफ वॉर सुरू केलं होतं. यात चीनवर लागू असलेले टॅरिफ तब्बल २५० टक्क्यांपर्यंत वाढले होते. मात्र, नंतर दोन्ही देशांनी आपापसांत चर्चा करून हे टॅरिफ वॉर थांबवले. आता भारताबरोबरही डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉरच सुरू केले आहे की काय? अशी शंका उपस्थित होण्याइतकं चिंताजनक चित्र सध्या निर्माण झालं आहे. रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करतो म्हणून आधी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादले. मग रशियाकडून कच्च्या तेलाची आयात केली जाते म्हणून आणखी २५ टक्के म्हणजे एकूण ५० टक्के टॅरिफ लागू केले.

अमेरिकेच्या या धोरणाचा नकारात्मक परिणाम भारतीय बाजारपेठेत दिसून आला. तसाच तो अमेरिकेतही दिसून आला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात घटून त्या वस्तूंच्या अमेरिकेतील किमती वाढू लागल्या आहेत. यावर अमेरिकेतील जनतेमध्येदेखील नाराजी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्स विकण्यास सुरुवात केली होती. तसेच, आणखी काही गुंतवणूकदार त्या विचारात असताना यासंदर्भात ख्रिस्तोफर वूड यांनी दिलासादायक भूमिका मांडली आहे.

विकू नका, खरेदी करा – ख्रिस्तोफर वूड

ख्रिस्तोफर वूड हे अमेरिकेतील आघाडीच्या कंपनीचे पदाधिकारी असल्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या या भूमिकेची चर्चा पाहायला मिळत आहे. “भारतानं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धोरणासमोर झुकता कामा नये. विशेषत: जेफरीजशी संलग्न गुंतवणूकदारांना माझं सांगणं आहे की सध्याच्या जागतिक परिस्थितीचा विचार करता तुम्ही भारतातील शेअर्सची विक्री करण्यापेक्षा उलट त्यांची खरेदी करायला हवी”, असा सल्ला वूड यांनी दिला आहे. त्यांच्या बहुचर्चित Greed & Fear या न्यूजलेटरमध्ये त्यांनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे.

दरम्यान, यात ख्रिस्तोफर वूड यांनी अमेरिकेने भारतावर लागू केलेले टॅरिफ ही फक्त काही काळाचीच बाब आहे, असंही म्हटलं आहे. “हे ५० टक्के टॅरिफ काही भारतीय शेअर्स विक्री करण्याचं कारण असू शकत नाही. उलट ते खरेदी करण्याचं कारण आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेलं टॅरिफ वॉर हे खुद्द अमेरिकेच्या हिताचं नाही. त्यामुळे ट्रम्प काही काळातच त्यांच्या भूमिकेपासून माघार घेतील”, असं ख्रिस्तोफर वूड यांनी नमूद केलं आहे.