आर्थिक अडचणीत सापडलेल्या ‘जेट एअरवेज’चे संस्थापक आणि माजी अध्यक्ष नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता यांना मुंबई विमानतळावर रोखण्यात आले. नरेश गोयल हे पत्नी अनिता यांच्यासह अमीरात एअरलाइन्सच्या विमानाने मुंबईवरुन परदेशात जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे.

नरेश गोयल आणि त्यांची पत्नी शनिवारी दुपारी अमीरात एअरलाइनच्या विमानाने मुंबईवरुन दुबईला जाण्यासाठी निघाले. विमान टेक ऑफ करण्यापूर्वी इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानातील दोन प्रवाशांना विमानातून उतरवण्याचे निर्देश दिले. हे दोन प्रवासी नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता होती. या दोघांसोबत आणखी एका प्रवाशाला विमानातून उतरवण्यात आले. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्याला उतरवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या मुळे विमानाच्या टेक ऑफला उशीर झाल्याचेही समजते.

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल हे दोन महिन्यांपूर्वी जेटच्या संचालक मंडळावरुन पायउतार झाले होते. त्यांनी जेटच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता. २५ वर्षांपूर्वी नरेश गोयल यांनी पत्नी अनितासह मिळून जेट एअरवेजची स्थापना केली होती. २८ व्यापारी बँकांचे ८,००० कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या जेट एअरवेजची विमान सेवा सध्या बंद आहे.