दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे, या चकमकीत सैन्य दलाने चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भारताचे दोन जवान हुतात्मा झाले असून एक नागरिकांचाही या चकमकीत मृत्यू झाला आहे. इतर दोन जवान दोघे गंभीर जखमी आहेत. आज (रविवार) सकाळी यारीपोरा येथे एका घरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी या घराला चारी बाजूने घेरले. त्यामुळे दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाल्यानंतरही अजूनही चकमक सुरू आहे. चकमक संपल्यानंतरच या घरात किती दहशतवादी लपून बसले होते हे स्पष्ट होईल. दहशतवाद्यांकडील चार शस्त्रे लष्कराने ताब्यात घेतले आहे.

यापूर्वी डिसेंबर महिन्यातही लष्कराने कुलगाम येथे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हे दहशतवादी एका घरात लपून बसले होते. सर्च ऑपरेशन राबवून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते.