सीबीआय प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पोलिसांचा दावा
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ९ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या वादग्रस्त कार्यक्रमाचे व्हिडीओ फुटेज सत्य असल्याचा निर्वाळा सीबीआयच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिल्याचा दावा पोलिसांनी शनिवारी केला. यामुळे कन्हैय्याकुमारसह त्याच्या सहकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
एका हिंदी दूरचित्रवाणी वाहिनीकडून मिळविण्यात आलेले हे प्राथमिक फुटेज सीबीआयच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यासोबत कॅमेरा, मेमरी कार्ड आणि फीत असलेली सीडी, वायर आणि अन्य उपकरणेही तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.
सीबीआयच्या प्रयोगशाळेतून दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडे ८ जूनला पाठविण्यात आलेल्या अहवालात हे प्राथमिक फुटेज सत्य असल्याचे म्हटले आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. विशेष पोलीस आयुक्त (विशेष कक्ष) अरविंद दीप यांनी प्रयोगशाळेकडून अहवाल आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला, मात्र त्यांनी सविस्तर तपशील सांगण्यास नकार दिला. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी या कार्यक्रमाच्या चार फिती गांधीनगरस्थित केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविल्या होत्या. त्याबाबत प्रयोगशाळेने मे महिन्यांत पाठविलेल्या अहवालात, या फिती सत्य असल्याचे म्हटले होते.
दिल्ली सरकारने सात चित्रफिती हैदराबादस्थित प्रयोगशाळेत पाठविल्या होत्या. त्यामधील दोन चित्रफिती बनावट असल्याचे आणि अन्य सत्य असल्याचे निदर्शनास आले होते. तथापि, या प्रकरणात प्राथमिक फुटेजच्या आधारावर एफआयआर नोंदविण्यात आला होता, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आलेल्या फितींवरून नव्हे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
जेएनयूमधील विद्यार्थी उमर खलिद याच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा एक गट भारतविरोधी घोषणा देत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे आणि त्यापैकी २१ घोषणा अंतरिम अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत, असा दावा पोलिसांनी एफआयआरमध्ये केला आहे.