दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) एका विद्यार्थीनीने ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (आयसा) संघटनेच्या कार्यकर्त्याने ‘सैराट’ चित्रपटाची सीडी देण्याच्या बहाण्याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ही विद्यार्थी ‘जेएनयू’मध्ये पीएचडीच्या प्रथम वर्षात शिकत आहे. या विद्यार्थीनीने ‘आयसा’च्या अनमोल रतनने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ‘जेएनयू’तील ब्रम्हपुत्रा वसतिगृहात शनिवारी ही घटना घडली. पीडित विद्यार्थीनीने काही दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक पेजवर ‘सैराट’ चित्रपटाची सीडी हवी असल्याची पोस्ट टाकली होती. त्यानंतर अनमोल रतन याने मेसेज करून आपल्याकडे ‘सैराट’ची सीडी असल्याचे सांगितले होते. ही सीडी देण्याच्या बहाण्याने अनमोलने शनिवारी पीडीत विद्यार्थीनीला गाडीने त्याच्या हॉस्टेलवर नेले. हॉस्टेलच्या खोलीवर गेल्यानंतर अनमोलने पीडितेला गुंगीचे औषध टाकलेले कोल्ड्रिंक दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच याप्रकरणाची वाच्यता न करण्यासाठी धमकावल्याचे संबंधित तरूणीने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, ‘आयसा’कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अनमोल रतन याचे संघटनेतील प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. ‘आयसा’कडून याप्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.
अफजल गुरूला संसद हल्ला प्रकरणात फाशी दिल्याच्या विरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून जेएनयू विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यानंतर भाजपच्या एका आमदाराकडून ‘जेएनयू’ हे अय्याशी करण्याचे ठिकाण असून, येथे रोज ३ हजार वापरलेले कंडोम मिळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगडचे भाजप आमदार ज्ञानदेव आहूजा यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. जेएनयूच्या परिसरात रोज ३ हजार वापरलेले कंडोम, २ हजार दारुच्या रिकाम्या बाटल्या, गर्भपातासाठी वापरण्यात येणारी ५०० इंजेक्शन, ५० हजार हाडांचे तुकडे आणि १० हजार सिगारेटचे तुकडे मिळत असल्याचे आहूजा यांनी म्हटले होते. याशिवाय, जेएनयूचे विद्यार्थी हे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली ‘नग्न नृत्य’ करीत असतात असाही आरोप त्यांनी केला होता.