गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. येत्या १५ नोव्हेंबर रोजी या दोन्ही राष्ट्रप्रमुखांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा होणार आहे. या भेटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भारतासोबत चीनच्या बिघडलेल्या संबंधांवर चर्चा होणार आहे. तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका या दोन देशांमधील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

वादाच्या विषयांवर चर्चा होणारच, अमेरिकेचा निर्धार

या चर्चेमध्ये चीन आणि अमेरिका यांच्यादरम्यान असलेल्या वादाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात मागे हटणार नसल्याचं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. “आम्ही नक्कीच सुरक्षेशी संबंधित विषयांवर चर्चा करू. चीनविषयी अमेरिकेला वाटत असलेली चिंता व्यक्त करण्यात जो बायडेन अजिबात हयगय करणार नाहीत”, अशी माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे.

या वर्षी फेब्रुवारीपासून जो बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यात होणारी ही तिसरी बैठक असेल. मात्र, तैवानच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाल्यानंतर दोन्ही देशांचे सर्वोच्च नेते पहिल्यांदाच बैठकीत समोरासमोर येत आहेत.

दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव वाढला

गेल्या महिन्याभरापासून तैवानचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला आहे. चीनकडून सातत्याने तैवानवर हक्क सांगण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली जात असताना अमेरिकेकडून तैवानला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. चीनविरोधात युद्धात तैवानच्या बाजूने अमेरिका असेल, अशी घोषणा देखील करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले असून त्यावर आता चीनकडून जग थेट शीतयुद्ध काळात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. खुद्द चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हा इशारा दिला आहे.

चीनशी युद्ध होणार? “तुम्ही एकटे नाहीत” म्हणत तैवानच्या बाजूने आता युरोपियन युनियनची उडी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शी जिनपिंग यांचा इशारा

“विचारसरणीच्या आधारावर मतभेदांच्या भिंती उभ्या करणे किंवा जागतिक राजकीय पटलावर छोटे छोटे समूह तयार करण्याचे प्रयत्न अपयशीच ठरणार आहेत. आशिया-पॅसिफिक विभागाने एकमेकांविरोधात उभे राहू नये. अन्यथा पुन्हा शीतयुद्धासारखी परिस्थिती ओढवू शकेल. जग पुन्हा तेव्हासारख्या गटांमध्ये विभागले जाईल”, असं शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे. एका ऑनलाईन बिझनेस कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते.