गोपेश्वर (उत्तराखंड) : चारधामपैकी एक बद्रिनाथचे प्रवेशद्वार असलेल्या जोशीमठ गावात भूस्खलन होऊ लागल्याने पाचशेहून अधिक घरांना तडे गेले आहेत. तेथील अतिधोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या ५० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून ६०० कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शुक्रवारी रात्री दिले. 

जोशीमठ गावातील रस्त्यांना गुरुवारपासून मोठमोठय़ा भेगा पडू लागल्या आहेत, तर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. तसेच सुमारे पाचशेहून अधिक घरांना तडे गेले आहेत. घरे धोकादायक बनल्याने अनेक कुटुंबांना हाडे गोठवणाऱ्या थंडीत रात्र काढावी लागली. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत नागरिकांनी शुक्रवारी रस्त्यांनावर ठाण मांडले. जोशीमठ येथे सुरू असलेल्या नॅशनल थर्मल

पॉवर प्रकल्पामुळेच गावाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी शुक्रवारी बंद पाळून प्रशासनाविरोधात असंतोष व्यक्त केला. मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी आज, शनिवारी जोशीमठला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेणार आहेत. मुख्यमंत्री धामी म्हणाले, ‘‘भाजपचे एक पथक जोशीमठ येथे पाठवण्यात आले असून आपण शनिवारी तेथे भेट देणार आहोत.’’

जोशीमठ येथील ५६० घरांना तडे गेल्याने आणि अनेक ठिकाणची जमीन खचल्याने शुक्रवारी तेथील नागरिकांनी जोरदार निदर्शनेही केली. प्रशासनाविरोधात घोषणा देत लोक रस्त्यावर उतरले. दुकाने आणि आस्थापना बंद करण्यात आल्या. तसेच काही नागरिकांनी रस्ता अडवला, असे जोशीमठ बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल सती यांनी सांगितले. प्रशासनाने अतिधोकादायक घरांतील ५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

रहिवाशांचे त्वरित पुनर्वसन करावे, एनटीपीसी बोगद्याच्या बांधकामाबरोबरच बद्रिनाथकडे जाणारा हेलांग आणि मारवाडीदरम्यानच्या वळणरस्त्याचे बांधकामही थांबवण्यात यावे तसेच या संकटाची जबाबदारी एनटीपीसीच्या तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पावर निश्चित करण्यात यावी आदी मागण्या नागरिकांनी केल्या होत्या. त्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असे सती यांनी सांगितले.

काँग्रेसनेही धामी सरकारने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. ‘‘जोशीमठ येथे सातत्याने दरडी कोसळत आहेत. अनेक घरांना तडे गेल्यामुळे भयभीत नागरिकांना कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरच रात्र काढावी लागत आहे. परंतु भाजपला फक्त सत्ता हवी आहे, नागरिकांच्या हिताची पर्वा न करता धामी सरकार सुखनिद्रेत आहे. जोशीमठला वाचवण्यासाठी तातडीने योग्य ती पावले उचलावीत,’’ असे काँग्रेसने म्हटले आहे.

बांधकामबंदीचे आदेश..

भूस्खलनानंतर जिल्हा प्रशासनाने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) मार्फत केले जाणारे हेलांग वळण रस्त्याचे बांधकाम, तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पाचे काम आणि अन्य सर्व बांधकामांवर बंदी घातली आहे.

भाजपचे एक पथक जोशीमठ येथे पाठवण्यात आले आहे. मी उद्या तेथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे.

पुष्करसिंग धामी, मुख्यमंत्री, उत्तराखंड

मंदिर कोसळले..

जोशीमठच्या सिंगधर भागात शुक्रवारी संध्याकाळी एक मंदिर कोसळले. त्यामुळे आधीच भीतीच्या छायेखाली असलेले रहिवासी चिंताग्रस्त झाले. मंदिर कोसळले तेव्हा मंदिरात कोणीही नव्हते. मंदिराला मोठय़ा भेगा पडल्यानंतर ते रिकामे करण्यात आले होते, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

बांधकामबंदीचे आदेश..

भूस्खलनानंतर जिल्हा प्रशासनाने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) मार्फत केले जाणारे हेलांग वळण रस्त्याचे बांधकाम, तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पाचे काम आणि अन्य सर्व बांधकामांवर बंदी घातली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जीव वाचविण्यास प्रथम प्राधान्य देत आहोत. त्यामुळे आणखी ६०० कुटुंबांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचा आदेश दिला आहे. – पुष्करसिंग धामी, मुख्यमंत्री, उत्तराखंड