आर्थिक घोटाळा करून पसार झालेला अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी याला खरे तर संगीत क्षेत्रात चमकदार कामगिरी करून दाखवायची होती. म्हणूनच कदाचित मुंबईतील ऐतिहासिक ‘ऱ्हिदम हाऊस’ त्याने विकत घेतले असावे. आज ऱ्हिदम हाऊसमध्ये मोदीच्या हिरे कंपनीची ब्रॅण्ड अॅम्बॅसीडर असणाऱ्या प्रियांका चोप्राचे भलेमोठे पोस्टर लागलेले आहे. काळाच्या ओघात नीरवची संगीत आवड मागे पडली. मग कुटुंबाच्या परंपरागत हिरे उद्योगात त्याने उडी घेतली. नीरवचे वडीलही हिरे व्यापारीच. हिरे उद्योगाची राजधानी मानल्या गेलेल्या बेल्जियममधील अॅण्टवर्पमध्ये नीरवचा जन्म झाला असला तरी तो अमेरिकेतील विद्यापीठीय शिक्षण सोडून मुंबईत परतला आणि जगात नाव कमावयाचा त्याने ध्यास घेतला.
गीतांजली जेम्स ग्रुप कंपनी नीरवच्या मामांची. तिथे नऊ वर्षांची उमेदवारी करून नीरवने स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा निर्धार केला. गीतांजली जेम्सचे अध्यक्ष आणि नीरवचे मामा मेहुल चोक्सी हेही मोदी घोटाळ्यातील आरोपी आहेत.
नीरवने हिरे आयात करण्याचा उद्योग सुरू केला. अर्थातच पुढची पायरी हिऱ्याला पैलू पाडून दागिने हीच होती. २००९ मध्ये नीरवने पैलू पाडायला सुरुवात केली. त्यानंतर थोडय़ाच काळात नीरव जगभरात नामांकित झाला. ४७ वर्षांचा नीरव दशकभरात अब्जाधीश बनला. २०१४ मध्ये फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदा समावेश झाला. खरे तर त्याच वर्षी तो अर्थविषयक तपास यंत्रणाच्या रडारवर आला होता. महसूल तपास संचालनालयाने नीरवची चौकशीही केली होती.
२०१० मध्ये नीरवच्या गोळकोंडा हिऱ्यांचा हार हाँगकाँगच्या लिलावात ३.५६ दशलक्ष डॉलरला विकला गेला. त्यानंतर वैविध्यपूर्ण रचनेचे अत्यंत किमती हार जगभर विकले गेले. हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्स्लेटपासून जगभरातील विविध क्षेत्रांतील वलयांकित नीरवच्या हिऱ्यांच्या दागिन्यांचे ग्राहक बनले.
न्यूयॉर्कपासून मकाऊपर्यंत नीरवच्या हिरे दागिन्यांच्या ब्रॅण्डची आलिशान दुकाने उघडली गेली. भल्यामोठय़ा जाहिरातींची पोस्टर्स लावली गेली. जाहिरात करणारी मंडळीही वलयांकितच होती. प्रियांका चोप्राने आता नीरवच्या विरोधात दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हिरे दागिन्यांचा भारतीय ब्रॅण्ड जगभर पोहोचवला हे श्रेय नीरवचे; पण हे करताना नीरवने आर्थिक गैरव्यवहार करून स्वत:चे जीवन मातीमोल बनवले आहे.