Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाप्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला काही दिवसांपूर्वी हरियाणामधून अटक करण्यात आली होती. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ती पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती असा आरोप करण्यात आला आहे. ज्योतीने दानिश या पाकिस्तानच्या उच्च अधिकाऱ्याच्या सांगण्यावरुन पाकिस्तानचा दोनदा दौरा केला आहे. आता तिच्या मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये पोलिसांना १२ टीबीचा डेटा मिळाला आहे.
पाकिस्तानमधल्या चार गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती मल्होत्रा पाकिस्तानमधल्या चार गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. या चौघांच्याही थेट संपर्कात ज्योती होती. दानिश, अहसान आणि शाहीद यांच्यासह आणखी एका अधिकाऱ्याच्या संपर्कात ज्योती होती. ज्योतीने तिचा मोबाईल आणि लॅपटॉप यामध्ये बराच डेटा साठवला होता. तो देखील पोलिसांना मिळाला आहे.
पोलिसांनी १२ टीबी डेटा रिकव्हर केला
पोलिसांनी ज्योतीचा मोबाइल, लॅपटॉप आणि इतर डिजिटल साधनांमधून १२ जीबी डेटा मिळवला आहे. यातून ही माहिती समोर आली आहे की ज्योती आयएसआयच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. ट्रॅव्हल विथ जो नावाचं युट्यूब चॅनल ज्योती चालवत होती. या चॅनलवर देशाची गुप्त माहिती पुरवल्याची कलमं लावण्यात आली आहेत. ज्योती मल्होत्राच्या विविध ट्रिप्स पाकिस्तानकडून स्पॉन्सर केल्या होत्या. ज्योतीला १५ मे रोजी अटक करण्यात आली. तिच्या युट्यूबला चार लाख सबस्क्राईबर्स आहेत. ज्योतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओत AK 47 घेऊन गार्ड उभे असलेले दिसत होते. स्कॉटिश व्लॉगरच्या व्हिडीओत हे दिसत आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

काय आहे या स्कॉटिश व्लॉगरच्या व्हिडीओत?
एक स्कॉटिश व्लॉगर पाकिस्तानात येऊन व्हिडीओ करत होता. त्यावेळी त्याच्या व्हिडीओमध्ये ज्योती मल्होत्रा सहा ते सात बंदुकधारी लोकांसह दिसत आहेत. हे सगळे पाकिस्तानचे सुरक्षा रक्षक आहेत असं सांगण्यात आलं. मात्र या सगळ्यांच्या हाती AK 47 बंदुका आहेत. तसंच सगळेजण सेमी फॉर्मल कपड्यांमध्ये दिसत आहेत. त्यांनी जी जॅकेट घातलेली दिसत आहेत त्यावर नो फिअर असं लिहिलेलं दिसतं आहे. बंदुकधारी लोक या भारतीय व्लॉगरच्या बाजूला का? असाही प्रश्न हा स्कॉटिश व्लॉगर विचारताना दिसतो आहे. आता मुख्य प्रश्न हा निर्माण होतो आहे की ज्योती मल्होत्राला इतकी सुरक्षा का पुरवण्यात आली? ती फक्त व्लॉगरच होती की आणखी काही अजेंडा पाकिस्तानला राबवायचा होता.
कोण आहे ज्योती मल्होत्रा?
ज्योती मल्होत्रा ही एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे. आलिशान आणि चैनीचं आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाली.
वडिलांसह एका छोट्या घरात राहणाऱ्या ज्योतीला पैसे कमवण्याची खूप घाई झाली होती. त्यामुळे तिने शिक्षण झाल्यावर तातडीने नोकरी शोधण्यास सुरुवात केली.
शिक्षण झाल्यानंतर तिने सुरुवातीला म्हणजेच १४ वर्षांपूर्वी एका कोचिंग इन्स्टिट्युटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं. मात्र ती नोकरी तिने सोडली.
सतत नवीन नोकऱ्या शोधणे आणि जुन्या सोडणे यातच तिचं आयुष्य पुढे सरकत गेलं. पण तिला तिच्या स्वप्नांप्रमाणे जीवन जगता येत नव्हतं.
त्यानंतर एका शाळेत आणि नंतर पुन्हा एका कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. मात्र अनेक नोकऱ्या तिने गेल्या काही वर्षांत बदलल्या आणि साधारण दोन वर्षांपूर्वी तिने तिचं युट्यूब चॅनल सुरु केलं होतं.