अकोले : कृषी मंत्रालय भारत सरकार संचलित ‘प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स व्हरायटिज अँड फार्मर्स राइट्स अथॉरिटी’ मार्फत पिकांच्या स्थानिक वाण संवर्धन आणि शाश्वात वापर यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय ‘जीनोम सेव्हियर कम्युनिटी’ पुरस्कार या वर्षी तालुक्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीला मिळाला आहे. दहा लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान येथील मुख्यालयात ११ नोव्हेंबर रोजी भारताचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण डगळे, तसेच बीज माता पद्माश्री राहीबाई पोपेरे, अन्नमाता ममताबाई भांगरे, बायफ संस्थेचे विषय तज्ज्ञ डॉक्टर विठ्ठल कौठाळे, जैव विविधता तज्ज्ञ संजय पाटील, विभाग प्रमुख जितीन साठे, प्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी  हा पुरस्कार व स्वीकारला.

स्थानिक वाण संवर्धन करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमांतून गेली आठ वर्ष तालुक्यात कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर शबरी आदिवासी महामंडळ नाशिक यांचे आर्थिक सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे. 

अकोले तालुक्यात ‘बायफ’ संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. वातावरण बदल आणि पोषण सुरक्षा यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुमारे ११४ वाणांचे संवर्धन संस्थेने केले आहे.

पारंपरिक बियाणे वापरून तयार होणाऱ्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देताना गेल्या हंगामात सुमारे दहा टन तांदूळ विक्री संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे. सात्त्विक आणि परिपूर्ण आहार प्रत्येकाच्या घरी मिळावा, यासाठी संस्थेच्या माध्यमाने परस बागांसाठी बियाणे निर्मिती केली जाते.

गेल्या हंगामात सुमारे १८ हजार आठशे परसबाग बियाणे संच विक्री करण्यात आलेले आहेत.  संस्थेच्या माध्यमाने आदिवासीबहुल गावांमध्ये जाणीव जागृती करून स्थानिक जैवविविधता जपण्यावर भर दिला जातो. संस्थेच्या माध्यमाने कोंभाळणे, एकदरे, देवगाव या गावांमध्ये गावरान बियाणे बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. या बीज बँकांमधून विविध प्रकारच्या स्थानिक प्रजातींचे बियाणे संवर्धित करून स्थानिक शेतकऱ्यांमार्फत पारंपरिक बियाण्यांचा वापर करून शेती पिकवण्यावर भर दिला जातो. संस्थेमार्फत तालुक्यातील सुमारे ३० ते ३५ गावांमध्ये स्थानिक जैव विविधता ठेवण्यासाठी काम करण्यात येत आहे. या भागातील प्रमुख पिके भात, नागली, वरई यासह भाजीपाला पिके, तेलबिया, तृण आणि गळीत धान्य यासह रानभाज्या, कंदमुळे यांचेही संवर्धनावर भर दिला जात आहे .

भात, वाल, घेवड्यांच्या वाणांचे जतन

या भागातील खास वैशिष्ट्य असलेला काळ भात रायभोग, कोळपी या भात वाणांचा त्यात समावेश होतो. या भागातील खास वैशिष्ट्य असलेल्या कडू व गोड वाल, हिरवा लाल घेवडा, वाटाणा घेवडा तसेच वरई पिकाच्या घोशी आणि दूध मोगरा या वाणांचे संवर्धन केलेले आहे. मुबलक प्रमाणात प्रोटिन उपलब्ध असलेल्या हुलग्याच्या वाणांचाही यामधे समावेश होतो. भात, वाल, हरभरा, वाटाणा या पिकांच्या सुमारे नऊ स्थानिक वाणांचे २५ मेट्रिक टन बियाणे गेल्या हंगामात या संस्थेने निर्माण करून त्याचे वितरण केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalsubai seed conservation committee honored with national award akp
First published on: 12-11-2021 at 23:42 IST